सोलापूर - अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत भाजप आणि शिवसेनेच्या युतीत सहभागी झाले. ते आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं आहे. सध्याचं संख्याबळ पाहता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यावर काँग्रेसच्या नेत्या, आमदार प्रणिती शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही हेड ऑन अटॅक करणं ही आमची स्ट्रॅटेजी आहे.या अधिवेशनात अटॅक मोडमध्ये आम्ही दिसून येऊ, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला अस्थिर सरकार देण्यात यशस्वी ठरलेत. हे सरकार जनमताचं सरकार नाही. लोकांमधून निवडून आलेले नेते नाहीत. 50 खोके आणि ईडीची भीती दाखवून आणलेलं हे सरकार आहे. जुळवाजुळवी करून भीती दाखवून सरकार करण्याचा हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे. ह्या सरकारने सत्ता स्थापनेत आणि स्वतःची सुटका करून घेण्यात जास्त वेळ दिला मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दिला नाही, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर केला आहे.
प्रणिती शिंदेंनी मोदींना टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. टिळक स्मारकाकडून मोदींना पुरस्कार घोषित होत असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो, असं त्या म्हणाल्या.
ज्या दिवशी ग्राफ त्यांच्या बाजूने येईल त्या दिवशी निवडणुका होतील. स्वतःचं जनमत वाढवण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी हे एकमेकांचा वापर करून घेत आहेत. मात्र असं असलं तरीही सर्वे त्यांच्या बाजूने येत नाही. अजूनही कल त्यांच्या बाजूने नाही म्हणून निवडणुकांची घोषणा होत नाही. लोक आता निवडणुकांची वाट पाहत आहेत. लोकांना विश्वास आहे की काँग्रेसच स्थिर सरकार देईल. त्यामुळे लवकरच पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार सत्तेत येईल, असा विश्वास प्रणिती यांनी व्यक्त केला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार जाहीर केल्याचा निषेध व्यक्त केला आहे. जुळवाजुळवी करून भीती दाखवून सरकार करण्याचा हा प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे. लोकांना विश्वास आहे की काँग्रेसच स्थिर सरकार देईल. लोक आता निवडणुकांची वाट पाहत आहेत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
विशेष म्हणजे काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे टिळक स्मारक समितीवर ट्रस्ट्री असूनही प्रणिती यांनी समितीचा निषेध केला आहे. त्यामुळे सोलापुरात प्रणिती यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.