Advertisement

पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन

प्रजापत्र | Sunday, 11/01/2026
बातमी शेअर करा

सातारा :भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेला जवान पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघातीमृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात घडली आहे. सिकंदराबाद-श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

   प्रमोद जाधव पत्नीच्या प्रसूतीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. पत्नी गरोदर होती आणि लवकरच कुटुंबात नवा पाहुणा येणार होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. एका भीषण रस्ता अपघातात प्रमोद जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या घरात लवकरच जल्लोष होणार होता, त्याच घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला.

 

 

आयशर टेम्पोची धडक; जागीच मृत्यु 

काही कामानिमित्त दुचाकीवरुन वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना, आयशर टेम्पोने जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला

 

मृत्युनंतर काही तासांतच लेकीचा जन्म

आज सकाळी प्रमोद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. पार्थिव गावात दाखल होताच एकच आक्रोश झाला. “अमर रहे, अमर रहे, प्रमोद परशुराम जाधव अमर रहे” या घोषणांनी परिसर दुमदुमला. विशेष म्हणजे, याच वेळेत त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू आणि नव्या पाहुण्याचे आगमन, या परस्परविरोधी दृष्याने संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले.

Advertisement

Advertisement