नेकनुर दि.११(वार्ताहार): बीड तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेकनूरच्या रविवारच्या बाजाराला आज मकरसंक्रांतीच्या बाजाराला चोरांनी लक्ष करत बबन कानडे या सोन्याच्या व्यापाऱ्याची १५ किलो चांदीची पेटी सकाळी १० च्या सुमारास चोरट्यांनी गायब केली असून अंदाजे किंमत २० लाख तर ५० हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.ही चोरी पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच घडल्याने खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून नेकनूरचा आठवडी बाजार खिसेकापू आणि मोबाईल चोरांसाठीच भरतोय की काय असे चित्र आहे. आठवडी बाजारात दूरवरून नागरिक व्यापारी येतात.कोंबड्या, शेळ्या, गाय, बैल, आदींची बाजारात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू असते. आज तर मकर संक्रांतीच्या तोंडावरचा बाजार असल्याने महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी बाजारात आहे, त्याच अनुषंगाने सोन्याचे व्यापारी बबन कानडे यांनी बाजारातील आपल्या दुकानात चांदी विकण्यासाठी आणली असता सदरील पेटी दुकान लावत असताना पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरुन चोरून नेली त्या पेटीत १५ किलो चांदी याची अंदाजे किंमत २० लाख तर ५० हजार रोख रक्कम होती. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

