Advertisement

५ वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यु

प्रजापत्र | Tuesday, 11/07/2023
बातमी शेअर करा

 

आष्टी - घरापासून काही अंतरावर खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. विहिरीतील पाणी उपल्यानंतर आज पहाटे चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. माऊली निकाजी काळे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

 

आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे राहत असलेल्या एका पारधी वस्तीवर काळे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. लाईट नसल्याने काळे कुटुंब जवळच्या विहिरीवरून शेंदून पाणी आणत. सोमवारी दुपारी काळे यांचे दोन लहान मुले खेळतखेळत विहिरीकडे गेले. दरम्यान, माऊली निकाजी काळे (वय- ५ ) हा विहीरीत पडला. त्यानंतर लहान भावाने घरी येऊन माऊली विहरीत पडल्याचे सांगितले. 

 

 

दरम्यान, चिमुकला विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी धाव घेतली. मात्र, विहीर खोल असून त्यात पाणी होते. त्यात लाईटची सोय नसल्याने ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने जनरेटर लावण्यात आले. संपूर्ण पाणी उपसल्यानंतर आज पहाटे चार वाजेच्या दरम्यान माऊलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे आणण्यात आला आहे.

 

घटनास्थळी आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार नवनाथ काळे,पोलिस नाईक संतोष दराडे यांनी पंचनामा केला.तर चंद्रकांत गळगटे, राजेश कराड, मच्छिंद्र डोंगरे, बाबूलाल आंधळे, संतोष आंधळे यांच्यासह ग्रामस्थानी मृतदेह काढण्यासाठी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement