माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखविला,यावेळी विधानपरिषदेची त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असतानाच ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापण्यात आली. याची करणे काहीही असोत, मात्र पंकजा मुंडे समर्थकांना हा धक्का पचविणे अवघड जात आहे. नेहमीप्रमाणे पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष व्यक्त होणे सुरु केले आहे. हे व्यक्त होणे म्हणजे अर्थातच फडणवीसांना शिव्याशाप देणे किंवा भाजपच्या नावाने सोशल मीडियावर बोटे मोडणे याच धाटणीचे असते. अपवादात्मक ठिकाणी काही कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात, भाजप कार्यालयासमोर धिंगाणा होतो, तसा प्रकार औरंगाबादेत झाला, काही दहा-पाच लोक राजीनामे देतात आणि त्यांचे राजीनामे लगेच नाकारले देखील जातात. पंकजा मुंडे समर्थकांच्या असल्या नाराजीची आता भाजप नेतृत्वलाही सवय झाली आहे. यापूर्वी असे प्रकार दोन तीन वेळा घडले आहेत. चार दोन दिवस असे वातावरण राहते आणि मग पुन्हा एके दिवशी पंकजा मुंडे 'हा पक्ष माझ्या वडिलांनी बांधला आहे, हा पक्ष माझा जीव आहेत, मोदी शहा माझे नेते आहेत ' असे सांगतात , आणि साऱ्या प्रकरणावर पडदा पडतो. फार झाले तर 'तुमची सेवा करण्यासाठी 'मला कोणत्याही पदाची गरजच काय ? असले एखादे परवलीचे वाक्य पंकजा मुंडे बोलतील आणि समर्थकांचा आजचा राग देखील शांत होईल.
प्रश्न समर्थकांच्या नाराजीचा किंवा रागाचा मुळातच नाही, प्रश्न आहे तो स्वतः पंकजा मुंडेंच्या भूमिकेचा. त्यांची स्वतःची कोणतीच भूमिका कधीच ठाम राहिलेली नाही. पंकजा मुंडे मोठ्या द्वेशाने बंडाची भाषा बोलतात , तलवार उगारतात , मात्र लगेच म्यान देखील करतात आणि मग कार्यकर्त्यांचो गोची होते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. गोपीनाथ मुंडे ज्यावेळी भूमिका घ्यायचे त्यावेळी त्यांना आपल्या भूमिकेमागे जनमत उभे करता यायचे. गोपीनाथ मुंडेंनी ज्या ज्या वेळी बंड केले, त्या दोन्हीवेळी त्यांना महाराष्ट्रभरातून 'माझ्या सोबत लोक आहेत ' हे दाखविता आले होते. त्यांच्यासाठी राजीनामे द्यायला अगोदर बीड जिल्ह्याबाहेरील लोक समोर असायचे, असे असतानाही भाजपवाले फारसे घाबरत नव्हते असा इतिहास आहे. आता पंकजांच्या बाबतीत तर परिस्थिती तशी देखील नाही. त्यांच्यासाठी त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याच्या बाहेरून फारसे कोणी मोठे लोक राजीनामे द्यायला समोर येत नाहीत, किंवा १०-२० आमदार रस्त्यावर येत नाहीत. एकीकडे वरची परिस्थिती अशी असताना जमिनीवरचे वास्तव देखील वेगळेच आहे. त्या विधानसभा हरल्या, त्यांच्या स्वतःच्या शहरातील नगर पालिका त्यांच्याकडे नाही, त्यांच्या तालुक्याची पंचायत समिती असेल किंवा त्यांच्या जिल्ह्याची जिल्हापरिषद , त्यावर त्यांचे वर्चस्व नाही. त्यांच्या वैद्यनाथ कारखान्याने एफआरपी दिली नाही म्हणून अनेकदा त्यांच्या कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश निघतात . लोक त्यांना भेटायला उत्सुक असतात, मात्र त्या मतदारसंघात देखील फार काळ नसतात. जिल्ह्यातील घटनाक्रमावर कधीतरी एखादे वक्तव्य करण्यापलीकडे त्या बोलत नाहीत. त्यामुळे मग स्वतःचा असा जो बेस लागतो, तो कोठे आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे . कदाचित यामुळेच मुळात पंकजा मुंडेंनाच कोणत्या रस्त्याने जायचे आहे याबद्दल संभ्रम असावा अशी परिस्थिती आहे. पक्षाकडून होणारी अडवणूक सहन होत नाही, मूळचा बंडखोर स्वभाव शांत बसू देत नाही, मात्र त्याचवेळी तगडा विरोध करण्यासाठी सारी शक्ती एकवटून उभे राहण्याचे धारिष्ट्य देखील होत नाही अशी परिस्थिती पंकजा मुंडेंची झाली आहे. पंकजा मुंडेंनी आजही लढायचे ठरविले तर त्यांच्यासोबत लोक येतील, नाही असे नाही, मात्र त्यासाठी जमिनीवर येऊन त्यांना विश्वास द्यावा लागेल. गोपीनाथ मुंडेंनी ज्यांना उभे केले असे लोक आजही अनेक आहेत, मात्र त्यांना विश्वास देऊन आणि मुळात सारे मोठेपण सोडून , जमिनीवर येता आले पाहिजे. तसे करायचे तर प्रसंगी कोणत्याही गोष्टीला सामोरे जायची तयारी ठेवावी लागते. कार्यकर्त्याच्या लहान मोठ्या अडचणीत उभे राहता आले पाहिजे. एका जिल्हा परिषदसदस्याला विरोधकांच्या कंपूतून सोडविण्यासाठी गोपीनाथ मुंडे उपोषणाला बसले होते, एका शिक्षकाला पोलिसांकडून मारहाण झाल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात धरणे द्यायला निघाले होते , हा 'वारसा ' घ्यावा लागणार आहे. जोपर्यंत स्वतः पंकजा मुंडेंची यासाठी मानसिकता होत नाही, तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या रागाला काहीच अर्थ नाही.