संकटावर मात करण्याची वृत्ती, संकट, आव्हान झेलून देखील, संहार पचवून देखील आयुषयाला ’हो ’ म्हणायची मानसिकता, ती आश्वासकता चिरंतन असते, आणि आश्वासकतेचे नाव तरुणाई, यंगिस्तान असते. आज तोच यंगिस्तान कोरोनाच्या महामारीला पुरून उरत नवनिर्मितीच्या मागे लागला आहे. हा यंगिस्तान ही आमची ओळख आहे. वय कितीही असो, पण नवनिर्मितीच्या मागे लागलेल्या, संकटांच्या छाताडावर पाय ठेवून खंबीरपणे उभ्या राहणार्या, संत तुकारामांच्या 'रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग’ या अभंगातून संघर्षाचा विचार घेत पुढे जाणार्या यंगिस्तानला शुभेच्छा.
’हे, भारतातील युवकांनो, आता उठा! जागे व्हा!!! आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. तेहतीस कोटी देव देवतांची बंदिस्त मंदिरात पूजा प्रार्थना करण्याऐवजी आपली शक्ती व वेळ या विराट अशा भारतमातेस अर्पण करा व या मातेच्या तेहतीस कोटी लेकरांची, ’शिवभावे जीवसेवा’ या भावनेतून सेवा करा सुभाषचंद्र बोससारख्या अनेक नेत्यांनी हे केले व आपल्या प्राणांची मातृभूमीच्या वेदीवर आहुती दिली या संग्रामात त्यांना आपली मातृभूमी सर्वश्रेष्ठ होती. दुर्दैवाने हे स्वातंत्र्य मिळताक्षणीच आम्हाला वाटले की आपले काम संपले व आपण तेथेचे थांबलो आपण पूर्णपणे विसरून गेलो की, स्वातंत्र्य ख-या अर्थाने पूर्णत्वास जाण्यास या स्वातंत्र्याचा लढा वेगवेगळ्या सामाजिकस्तरावर चालूच असावा लागतो.
देशसेवेच्या समिधा वाहत राहिल्याशिवाय यज्ञातील अग्नी प्रदिप्त असूच शकत नाही. तो विझून जाईल व आपले तेच घडले. आज आपण वेगवेगळे संप्रदाय, पंथ, धर्म यामध्ये विभागले गेलो. आपल्याभोवती अनेक विहिरी बांधून आपण या असंख्य विहिरीत राहू लागलो व बाहेरील जनसागराचा, समाजाचा आपल्याला विसर पडला. सनातन अशा हिंदू धर्मात जो मानव धर्म अभिप्रेत आहे त्या विश्वधर्माची आपली पकड हळूहळू ढिली पडत गेली. सगळेच धर्म सत्य असून त्या वेगवेगळ्या मार्गानी आपण अंतिम सत्याकडे म्हणजेच ईश्वराकडे पोचू शकतो, या वेदांतील वचनाचे आपणास विस्मरण घडले. आपण याचे आत्मचिंतन करूया. आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आऽ वासून उभे आहेत. गरीब लोक उपासमारीने व कर्जाला कंटाळून आजही घरी सुखरूप परतेल याची शाश्वतीही कमी झाली आहे. अनेक युवक,युवती नैराश्येपोटी आत्महत्येस प्रवृत्त झाल्या पिळवणूक, व्यभिचार, युवती-स्त्रियांवर होणारे अत्याचार बलात्कार आपण आपल्यास सोयरसुतक नसल्याप्रमाणे निष्क्रिय राहून किती वेळ सोसणार? दिल्लीच्या प्रकरणाने आज सावधानतेची घंटा वाजली आहे. तेव्हा ’पुढे चला, सतत पुढे चला! हे भाषण होते स्वामी विवेकानंदांचे .
जागतिक धर्म परिषदेतून भारतात परतल्यानंतर 1897 साली मद्रासमध्ये त्यांचे पहिले भाषण झाले. त्यावेळी विवेकानंदांनी या भावना व्यक्त केल्या होत्या. आजच्या तरुणाईला देखील आज 125 वर्षांनंतरही हेच विचार लागू होतात, इतके या विचारांचे सर्वकालिकत्व आहे. आज तरुणाईसमोर अनेक आव्हाने आहेत. आणि त्या आव्हानांमधून मार्ग काढण्यासाठी आपल्याला इतिहासाचा धांडोळा घेत भविष्यात मार्गक्रमण करायचे आहे.
आजही धार्मिक विद्वेषाकडे तरुणाईला वळविण्याचा हरप्रयत्न होत आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. महामारीसारख्या जागतिक संकटांनी अनेकांची स्वप्ने धुळीला मिळाली आहेत. अनेकांचे उद्योग, व्यवसाय बंद पडले. हातचा रोजगार गेला, जगण्याचे प्रश्न निर्माण झाले हे सारे खरे असले तरी ही नाण्याची केवळ एक बाजू आहे. आव्हानांना तोंड देत आजची तरुणाई नवनिर्मितीच्या मागे लागली आहे.
बीड जिल्ह्यात तरुणाईने वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. यात महिलाही मागे नाहीत. शिक्षण, सहकार, उद्योग, राजकारण , समाजकारण , सेवा, संघटन आदी सर्वच क्षेत्रात बीड जिल्ह्यातील ’यंगिस्तान’ चमकत आहे. याच तरुणाईचा वेध घेण्याचा कांहीं अशी प्रयत्न आज ’प्रजापत्र ’च्या या अंकातून झाला आहे. अर्थात यात निवडलेल्या व्यक्तिरेखा मोजक्या आणि प्रातिनिधिक आहेत, हा शेवट नाही तर जिल्ह्यातील यंगिस्तानची ही सुरुवात आहे.
संकटं आहेत, आव्हाने आहेत म्हणून खचून न जाता ,अडखळून न बसता , आपल्या स्वप्नांच्या मागे धावणारी पिढी आता आपल्यासमोर आहे. एक उद्योग बंद करावा लागला तर नव्याने नवीन उद्योगात पाऊल टाकायला ही पिढी डगमगत नाही. या पिढीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, उत्साह आहे. त्या उत्साहाला, उर्जेला दिशा देता आली तर काय बदल होऊ शकतात हे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील यंगिस्तानने दाखवून दिलेले आहे.
कोरोनाच्या महामारीचा बाऊ न करता वाटचाल करता येते हे बीड जिल्ह्यात गावपातळीपासून जे उद्योग तयार झाले त्यातून समोर आले आहे. कोरोनामुळे ज्यावेळी बाजर बंद करावे लागले, त्यावेळी इथल्या शेतकर्यांच्या पोरांनी आपल्या शेतातील भाजपाला थेट जनतेच्या घरी पोहोचविण्याचा उद्योग सुरु केला, संघटन आणि उद्यमशीलता यांची जोड घालून संकटाचे संधीत रूपांतर कसे करता येते हे दाखवून दिले. तेच अनेक क्षेत्रांना लागू आहे. म्हणूनच आज बीड जिल्ह्यात लहान मोठ्या उद्योगांच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार स्वतः शोधण्याची परंपरा सुरु झाली आहे. येथे पदवीधर झालेल्यांना नोकरी लागत नाही म्हणून ’पदवीधर’ या नावानेच चहाच्या गाड्याच्या माध्यमातून स्वयंरोजगार शोधण्याची परंपरा आहे .
केवळ उद्योगातच नव्हे तर आता शेतीमध्येही तरुणाई पुढे येत आहे. मागच्या 4-5 वर्षातील राज्य सरकारने कृषिभूषण म्हणून गौरविलेल्या शेतकर्यांवर नजर टाकली तर त्यात बीड जिल्ह्यातील बहुतांश तरुण शेतकरी आहेत हे समोर येईल. त्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून रडतरडत नव्हे तर गाणे म्हणत जगणायचा मार्ग शोधला आहे. कला, क्रीडा आदी क्षेत्रात करिअर करता येते हे बीड जिल्ह्यातील यंगिस्तानने दाखवून दिले आहे. म्हणूनच आजचा दिवस खर्या अर्थाने त्या सर्वांपासून प्रेरणा घेण्याचा आहे.
विवेकानंदांनी ’विजय, पूर्ण विजय’ चा नारा दिला होता. अर्थात केवळ नारा देऊन विजय मिळविता येत नसतो , तर त्यासाठी तितक्याच टोकाच्या संघर्षाची, सातत्याची तयारी ठेवावी लागते. आजच्या तरुणाईमध्ये अर्थातच ती ऊर्जा ठासून भरलेली आहे. म्हणूनच आमचा आशावाद आजही जिवंत आहे. महामारीच्या काळात ज्यावेळी अनेकांसमोर प्रश्न निर्माण होत होते, त्यावेळी बीड जिल्ह्यातून उत्तरे मिळत गेली.
अनेक नवे व्यवसाय मग तो तेलघाण्याचा असेल, गुळाचा असेल, नवीन बँक, निधी संस्था असेल, कृषी प्रक्रिया उद्योगाचा असेल किंवा व्हिडीओ गेम तयार करण्याचा असेल, महिलांनी कपडे शिवण्यापासून ते वाळवणाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा असेल, अशा अनेक माध्यमातून आम्ही रोजगार निर्माण केला. संकटे आम्हाला नमवू शकत नाहीत हे आम्ही दाखवून दिले आहे. आणि हीच आमची आश्वासकता आहे. याच आश्वासकतेवर उद्याची उज्वल पिढी निर्माण होणार आहे. संकटे, आव्हान , संहार हे अधून मधून येतच असत. आम्ही महाभारत काळापासून ते अनुभवलं आहे. महाभारतात झालेला संहार, त्यानंतर काही उरणार का नाही असा पडलेला प्रश्न, शेती करायला देखील माणूस शिल्लक नाही अशी निर्माण झालेली परिस्थिती मात्र त्यावरही या समाजाने मात केली. महाभारत हा विषय खूप मागचा झाला, अगदी मागच्या 1897 नंतर आलेली ब्यूबॅनिक प्लेगची साथ असेल, मुंबई, पुणे ही महानगरे उद्धवस्त झाली होती, त्यातून आम्ही सावरलो. त्यानंतरच्या काळातील दंगली, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले या सर्वांमुळे आम्ही काळ अस्वस्थ झालो, पण लगेच सावरलोही, कारण संकटं तात्कालिक असतात.