Advertisement

भाजपच्या प्रदेश सदस्य निवडीत बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंचेच वर्चस्व

प्रजापत्र | Wednesday, 09/07/2025
बातमी शेअर करा

बीड-भाजपने आपली सुमारे साडेचारशे प्रदेश सदस्यांची (BJP State council) यादी काल जाहीर केली असून यात बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे गटाचेच वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बीड जिल्हा भाजपात सरळसरळ दोन गट पडल्याचे चित्र असले तरी भाजपने मंत्री पंकजा मुंडे(Pankaja Munde)गटालाच झुकते माप दिले आहे.
  बीड जिल्हा भाजपात विधानसभा निवडणुकीनंतर सरळसरळ दोन गट पडले आहेत. मंत्री पंकजा मुंडे आणि आ. सुरेश धस (Suresh Dhas) हे एकाच पक्षात समोरासमोर आल्याने भाजपमधील हा वाद प्रदेशपातळीवर देखील चर्चिला गेला.नियोजन समितीवरील (DPC) विधानमंडळ सदस्यांमधून सदस्य नेमण्याचा विषय असेल किंवा जिल्हाध्यक्ष निवडीचा,भाजपने पंकजा मुंडेंच्या शब्दालाच अधिक महत्व दिल्याचे स्पष्ट झाले होते.त्यानंतर आता भाजप प्रदेश समितीच्या सदस्य निवडीतही पंकजा मुंडे गटालाच संधी मिळाली आहे.
भाजपने सुमारे साडेचारशे सदस्यांची प्रदेश समिती यादी जाहीर केली आहे.यात स्वतः पंकजा मुंडेंसह अक्षय मुंदडा (केज) अरुण राऊत (माजलगाव ),विजय गोल्हर (आष्टी),सर्जेराव तांदळे (बीड) असे सदस्य नेमण्यात आले आहेत. हे सारेच सदस्य मंत्री पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे भाजपने बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंनाच मोकळा हात दिल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Advertisement

Advertisement