बीड दि.२२ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात मागच्या काही काळात वाळू तस्करीच्या संदर्भाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेतली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त पथके स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, मात्र असे असले तरी आजही वशिलेवाल्यांच्या वाहनांमधून सर्रास वाळू तस्करी सुरूच आहे.कधी पोलीस तर कधी महसुलाचे अधिकारी छोट्या मोठ्या कारवाया करतात,मात्र ज्यांचा वशिला मोठा आहे आणि जे यंत्रणेतलेच आहेत त्यांच्या वाळूच्या गाड्या मात्र सर्रास सुरु आहेत.विशेष म्हणजे अशा कठीण काळात वाळू सुरु ठेवण्यासाठी 'स्थानिक' यंत्रणेचा नजराणा थेट पन्नास हजारापर्यंत पोहचल्याची चर्चा सर्वत्र आहे.यंत्रणेतलेच लोक असा नजराणा 'वरपत' असल्याने जिल्हाधिकारी आणि एसपी कितीही कठोर झाले तरी काय होणार असा प्रश्न आहे.
बीड जिल्ह्यातील मोठ्याप्रमाणावर अर्थकारण कायम वाळूभोवती फिरत आलेले आहे.वाळू तस्करीच्या अनेक घटना बीड जिल्ह्यात घडत असतात. मागच्या एक-दीड वर्षात बीड जिल्ह्यात वाळूचे कंत्राट अधिकृतपणे गेलेच नाही,मात्र बांधकामे थांबलेली नाहीत.फक्त या वाळूसाठी सामान्यांना मोठ्याप्रमाणावर किंमत मोजावी लागत आहे.मागच्या काळात एसपीनी पुढाकार घेऊन वाळू तस्करी रोखण्यासाठी कारवाया सुरु केल्या.त्यातच राज्य सरकारने वाळू तस्करीविरुद्ध फौजदारी करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले,त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आणि महसुलाची संयुक्त पथके गठीत करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
मात्र असे सारे असले तरी आजही जिल्ह्यात काही मोजक्याच वशिल्याच्या गाड्यांमधून वाळू तस्करी होतच आहे.एकतर या गाड्या 'रक्षक' म्हणवणारांच्या संबंधितांच्या आहेत किंवा मोठ्या लोकांच्या आहेत.या विशेष गाड्यांसाठी नजराणा देखील मागच्या काळात वाढला असून 'ग्रामीण' मधून शहरात आलेले लोक महिन्याला एका वाहनांकडून पन्नास हजारापर्यंत रक्कम 'स्थानिक' यंत्रणेतले लोक 'वरपत' असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे एसपींच्या रडारवर येऊ नये आणि कोणत्या सीडीआरतमध्ये अडकू नये म्हणून अशा नजराण्याच्या वसुलीसाठी थेट खाजगी व्यक्तींची 'पोलीस मित्र' सेवा घेण्याचा प्रयत्न ही होत असल्याच्या चर्चा आहेत.या साऱ्या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना मात्र वाळूसाठी प्रचंड रक्कम मोजावी लागत आहे. यात गब्बर होणारे मोजकेच असून सामान्यांना मात्र थेट आर्थिक फटका बसत आहे.
आठ पथके ठेवणार ३६ वाळूघाटांवर नजर
बीडच्या जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ३६ वाळूघाटांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची आठ पथके गठीत केली आहेत. नायब तहसीलदार हे या पथकाचे प्रमुख राहणार असून या पथकात मंडळ अधिकारी, तलाठी आणि एक पोलीस अधिकारी व एक पोलीस कर्मचारी राहणार आहे. माजलगाव तालुक्यासाठी ३, परळी तालुक्यासाठी १, गेवराई तालुक्यासाठी २ तर बीड तालुक्यासाठी २ पथके कार्यरत राहणार आहेत. या पथकांना वाळू तस्करी रोखण्यासाठी कारवाया करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आणि प्रसंगी एमपीडीएच्या कारवाईसाठी शिफारशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या संयूक्त स्वाक्षरीने ही पथके गठीत करण्यात आली आहेत.