Advertisement

 अजित पवार पंचतत्वात विलीन

प्रजापत्र | Thursday, 29/01/2026
बातमी शेअर करा

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतीष्ठानच्या प्रांगणात अंत्यविधी पार पडले. अजितदादांना मुलगा पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांचा बारामतीत विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. अजित पवार यांना निरोप देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आले होते. लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.

       मुंबईहून बारामतीला येत असताना लँडिंगवेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांचे पार्थिव बारामतीत विद्या प्रतीष्ठानमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. यानंतर आज सकाळी काटेवाडीत त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं. तिथं मानवंदना दिल्यानंतर पुन्हा विद्या प्रतीष्ठानच्या प्रांगणात आणण्यात आलं. काटेवाडीपासून बारामतीतील विद्या प्रतिष्ठानपर्यंत अजित पवार यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला होता.

बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या मृत्यूने पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिल्लीत संसद अधिवेशनासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि भगिनी सुप्रिया सुळे या अपघाताचे वृत्त कळताच विशेष विमानाने बारामतीसाठी रवाना झाल्या. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाल्याने राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार कालच दिल्लीत दाखल झाल्या होत्या. तर, पुत्र पार्थ पवार हे देखील दिल्लीत आले होते. दुर्घटनेची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची विचारपूस केली. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वद्रा यांनीही पवार कुटुंबीयांशी बोलून सांत्वन केले.

Advertisement

Advertisement