राजस्थानातील खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविक गेले होते.कुटुंबीय आणि नातेवाईक असे सगळे जण गेले होते. दर्शन घेऊन घराकडे निघाल्यानंतर काळाने वाटेतच झडप घातली आणि क्षणात ९ जणांचा जीव गेला.भाविकांची गाडी एका ट्रकवर जाऊन धडकली.या अपघात इतका भीषण होता की,गाडीचा चक्काचूर झाला.यात ६ भाविक जखमी झाले आहेत.राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात असलेल्या कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा जवळ हा भीषण अपघात घडला. खाटू श्यामजी येथून परतणाऱ्या १६ भाविकांना घेऊन जाणारे वाहन उभ्या ट्रकला धडकल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेक जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील शंभूपुरा गावाजवळील कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर एक क्रूझर वाहन उभ्या ट्रकला धडकल्याने लहान मुलांसह किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले.नांता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ महाराष्ट्रातील एका कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाणारे हे वाहन उभ्या असलेल्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.अपर जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,हे कुटुंब खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला."मध्यरात्री १६ जणांना घेऊन जाणारे वाहन शंभूपुराजवळ एका ट्रकला धडकले.हा एक अत्यंत भयंकर अपघात होता.यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. ते सर्व खाटू श्यामचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतत होते आणि ते एकाच कुटुंबातील होते," सहा जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचे जोशी यांनी सांगितले.दरम्यान, या अपघातात मृत्यु झालेल्यांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतांची ओळख आणि जखमींच्या प्रकृतीबाबतची अधिक माहिती प्रशासनाकडून मिळवली जात आहे.

