Advertisement

  ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचाऱ्याने हडपली सहा लाखांची रक्कम   

प्रजापत्र | Wednesday, 23/07/2025
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२३(प्रतिनिधी): शहरातील (Ambajogai) एका ग्राहक सेवा केंद्रातून कामावर असलेल्या कर्मचाऱ्याने तब्बल ६ लाख ८ हजार ६०० रुपयांचा आर्थिक अपहार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात त्या कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             शरद आश्रुबा चव्हाण रा. मोरेवाडी, ता.अंबाजोगाई (Ambajogai) यांचे यशराज ई-सर्व्हिसेस नावाचे ग्राहक सेवा केंद्र नगर परिषद इमारतीत कार्यरत आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बँकिंग सेवा पुरवणाऱ्या या केंद्रात बँक व्यवहारांचे कामकाज पाहण्यासाठी किरण काशीनाथ जोगदंड याला गेल्या चार वर्षांपासून नोकरीवर ठेवले होते. चव्हाण हे निवडणुकीच्या कामासाठी वारंवार बाहेरगावी जात असल्याने आर्थिक व्यवहाराचा संपूर्ण अधिकार(Froud) किरणकडे सोपवण्यात आला होता.

मार्च २०२५ मध्ये खात्याच्या तपासणीदरम्यान त्यामध्ये मोठी आर्थिक तफावत असल्याचे शरद चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी ग्राहक सेवा केंद्रामार्फत झालेल्या सर्व व्यवहारांची चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज व बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर हे उघड झाले की, मागील जवळपास तीन वर्षांच्या कालावधीत किरण जोगदंड याने मित्र शुभम जोगदंड, बहीण पूजा जोगदंड, पत्नी वैष्णवी जोगदंड आणि मित्र सुनिल पाटोळे यांच्या खात्यांवर विविध तारखांना रक्कम जमा करून ती परत स्वतःकडे घेतली होती. बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील व एयरटेल पेमेंट बँकेच्या खात्यांमधून किरण जोगदंड याने  तब्बल ६ लाख ८ हजार ६०० रुपयांचा अपहार केला असून, संबंधित रक्कम फसवणुकीने हस्तांतरित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. किरण याने हेतुपुरस्सर विश्वासघात करून स्वतःच्या नातेवाईकांच्या मदतीने रक्कम परस्पर ट्रान्सफर करून फसवणूक केली असल्याचे शरद चव्हाण यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
 किरण जोगदंड याच्या विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर कांबळे करत आहेत. 

Advertisement

Advertisement