आष्टी दि.१० (प्रतिनिधी) : आष्टी मतदारसंघातील एका राजकीय घडामोडीमध्ये आष्टी आणि पाटोदा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांनी सोमवारी आपल्या पदाचे राजीनामे दिले. नगराध्यक्षपदाची मुदत अडीच वर्षाची असून पक्षीय पातळीवरील निर्णयाप्रमाणे सव्वा वर्षाची संधी प्रत्येकाला देता यावी यासाठी हे राजीनामे दिल्यात आल्याची माहिती आहे . त्यामुळे आता आष्टी आणि पाटोदा येथे नगराध्यक्ष म्हणून आ. सुरेश धस कोणाच्या नावर शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आष्टी, पाटोदा नगरपंचायतीची निवडणूक सव्वा वर्षांपूर्वी झाली होती. या नगरपंचायती आ. सुरेश धस यांच्या ताब्यात आहेत. आष्टी येथे पल्लवी धोंडे तर पाटोदा येथे सय्यद खतिजाबी अमर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. नगराध्यक्ष पदाचा कालावधी अडीच वर्षाचा असला तरी पक्षीय पातळीवर सुरुवातीलाच सव्वा वर्ष प्रत्येकाला संधी असे राजकीय समीकरण ठरले होते. त्यामुळे आता सव्वा वर्ष होताच पल्लवी धोंडे (आष्टी ) आणि सय्यद खतिजाबी अमर (पाटोदा ) यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
आता कोण ?
या राजीनाम्यानंतर आष्टी आणि पाटोदा येथे नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरु आहे. आष्टीत आ. सुरेश धस यांचे कट्टर समर्थक असलेल्या जिया बेग यांच्या मातोश्री आयेशा इनायतउल्ला बेग यांना अध्यक्षपदाची संधी दिली जाईल अशीच शक्यता सर्वाधिक आहे. तर पाटोद्यात यावेळी मराठा समाजाला संधी द्यावी असा सूर आहे. एठिकाणी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे सामाजिक समतोल सांभाळून आ. सुरेश धस निर्णय घेतील असे सांगितले जाते.