मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्रीपदाची माळ गळ्यात पडलेले धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या वेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी पंकजा मुंडे या भावुक झाल्याचे दिसून आले.
या संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती शेअर केली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, 'राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे.
दोघांमधील जवळीक वाढली
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये गेल्या काही वर्षात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. एकमेकांसमोर आल्यानंतर दोघांमध्ये असलेले भावनीक नाते अनेकदा समोर आलेले आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याने या दोघांमध्येही दीलजमाई होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.