Advertisement

17-18 आमदार संपर्कात, 4 आमदारांशी आज सकाळीच चर्चा

प्रजापत्र | Friday, 07/07/2023
बातमी शेअर करा

 

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी शिवसेनेचे 17 ते 18 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. इतकेच नाही तर चार आमदारांशी आज सकाळीच चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दावा केला की, 'अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर नेते सरकारमध्ये आल्यापासून शिंदे गटातील 17 ते 18 आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला आहे.' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदारांच्या नाराजीची जाणीव असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या दोघांमध्ये रात्री उशीरा बैठक झाली. यावरुन संजय राऊत यांच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.

 

त्यांनीच संपर्क साधला

त्यांच्या व्यथा आणि वेदना ते आमच्याकडे मांडत असतात. या आधी ते आमच्या संपर्कात नव्हते. त्यांचा आणि आमचा अजिबात संपर्क होत नव्हता. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसात त्यांनी स्वत:हून आमच्याशी संपर्क साधला असल्याची माहिती देखील खासदार संजय राऊत यांनी दिली.

 

 

सेनेची आता गरज नाही

"सरकारकडे बहुमत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट त्यात सामील झाला आहे. याचा अर्थ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेची आता गरज नाही," असेही खासदार संजय राऊत म्हणाले. त्यांनी सांगितले की, अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र शिंदे यांच्या गटातील कोणालाही शपथ देण्यात आली नाही. महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

 

शिंदे यांना नाराजीची जाणीव

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी बुधवारी सांगितले होते की, राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचा मंत्रिमंडळात समावेश केल्याने भाजप आणि शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या उमेदवारांची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे काहीजण संतापले असून शिंदे यांना याची जाणीव होती.'

Advertisement

Advertisement