Advertisement

बजरंग सोनवणे सोमवारी दाखल करणार अर्ज

प्रजापत्र | Saturday, 20/04/2024
बातमी शेअर करा

बीड- बीड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे सोमवारी (दि.२२) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, माजी आ. उषा दराडे, माजी आ. सय्यद सलीम, माकपचे अजय बुरांडे, भाकपचे नामदेव चव्हाण, शेकापचे घुमरे आदींची यावेळी उपस्थिती होती. 

 

यावेळी बजरंग सोनवणे यांनी आपण सोमवारी उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले. वाढत्या उन्हामुळे आपण शक्तिप्रदर्शन करणार नाही. महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जनतेचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. 
यावेळी घटक पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आपण एकदिलाने, एकजुटीने बजरंग सोनवणे यांच्या विजयासाठी झटणार असल्याचे सांगितले.

Advertisement

Advertisement