ज्या भिडेवाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंनी मुलींसाठीची शाळा काढली होती त्या भिडे वाड्याला स्मारक बनविण्याचा मार्ग प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर मोकळा झाला आहे. महापुरूषांची स्मारके कायम प्रेरणा देत असतात त्यामुळे सावित्रीमाईंच्या जयंतीच्या काही काळ अगोदर आलेला हा निर्णय महत्वाचा आहे. याठिकाणी सावित्रीमाईंचे स्मारक होणार आहेच. त्या स्मारकातून प्रेरणा घेवून सावित्रीमाईंच्या विचारांचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राने पुढे न्यावा हीच आजच्या काळाची गरज आहे, आणि त्या दिशेने पाऊले उचलली जाण्यासाठी समाजसुधारांनी आणि व्यवस्थेने देखिल पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्राला केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक क्रांतीची दिशा देण्याचे काम फुले दाम्पत्याने केले. महात्मा ज्योतिबा फुले यांचे या कार्यातील योगदान निश्चितपणे फार मोठे आहे. त्यांच्या सोबतच या कार्यासाठी जो त्याग आणि संघर्ष सावित्रीमाई फुलेंना करावा लागला तो देखिल अर्थातच फार मोठा आहे. स्वतः शिकून नंतर मुलींना शिकविण्याची जबाबदारी घेणे हे आज वाटते तितके त्या काळात सोपे नव्हते. मात्र प्रचलित व्यवस्थेला धक्के देण्यासाठीची जी प्रबळ मानसिकता लागते आणि आपल्या स्वतःच्या कार्यावर जो प्रचंड विश्वास लागतो तो विश्वास सावित्रीमाईंमध्ये निर्माण करण्यात ज्योतिबांना यश आले आणि म्हणूनच महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक क्रांतीची मशाल या फुले दामप्त्याला पेटविता आली. सावित्रीमाई फुलेंनी त्यावेळी जी मशाल पेटविली त्याच मशालीमुळे आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या, रचनात्मक कामात स्वतःचे स्थान सिद्ध करणाऱ्या, प्रशासकीय आव्हाने पेलणाऱ्या आणि राजकारणातही स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिला घडू शकल्या हे नाकारता येणार नाही. म्हणूनच आज सावित्रीमाईंच्या जयंतीच्यानिमित्ताने आपल्या आसपास सावित्रीच्या लेकी कशा घडतील हे पाहणे अधिक महत्वाचे आहे.
महाराष्ट्राला पुरोगामित्वाची फार मोठी परंपरा आहे असे आपण अभिमानाने सांगतो. पण असे असले तरी हा महाराष्ट्र कधीच पूर्णतः पुरोगामी नव्हता. सरंजामी मानसिकतेतून या राज्याची सुटका कधीच पूर्णतः झाली नाही. वेगवेगळ्या कालखंडात जे महामानव जन्माला आले त्या महामानवांनी त्या त्या काळात पुरोगामित्वाचा विचार जिवंत ठेवून पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम केले आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रासारख्या राज्यात पुरोगामीपण जिवंत आहे. बुरसटलेल्या विचारांना धक्के देवून समाजाला केवळ शिक्षीत नव्हे तर विवेकी बनविण्याचे काम पुरोगामी विचारवंतांनी केले. त्यामध्ये सावित्रीमाईंचे योगदान निश्चितपणे मोठे आहे. सावित्रीमाईंनी हे सारे करताना कधी मोठमोठी भाषणे दिली नाहीत मात्र त्यांनी स्वतःच्या जगण्या वागण्यातून आणि कृतीतून पुरोगामी विचारधारा जिवंत ठेवण्याचे काम केले. मात्र आज त्याच सावित्रीच्या लेकी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या महिला कार्यरत आहेत त्या महिलांची बुरसटलेल्या प्रथा, परंपरामधून सुटका झाली आहे का? हा देखील विचार करण्याचा मुद्दा आहे. येत्या कांही काळात पुण्यात सावित्रीमाईंचे आणि ज्योतिबा फुलेंचे स्मारक होईल. ज्या भिडे वाड्यात या दामप्त्याने मुलींची शाळा सुरू
केली होती त्या वाड्यालाच स्मारकाचे स्वरूप दिले जाणार आहे आणि हे होत असताना त्याच्या जवळच आजही वेगवेगळ्या प्रथा, परंपरा पाळण्यासाठी महिलांची जी स्पर्धा लागलेली आहे ती पाहता महामानवाच्या स्मारकातून आणि चरित्रातून हा समाज नेमका काय विचार घेणार हे देखील पाहणे महत्वाचे आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी स्वतःला सिद्ध केले आहे. असे असले तरी एक शोषित म्हणून महिलांच्या वाट्याला आलेले जिणे अजून तरी संपले आहे असे म्हणता येणार नाही. किंबहूना त्या शोषणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्या शोषणाविरुद्धचा संघर्ष करण्याची मशाल प्रत्येक महिलेच्या मनात पेटण्याची गरज आहे. तो विचार, तो वसा आणि वारसा जिवंत ठेवणे हेच खऱ्या अर्थाने सावित्रीमाई फुलेंना अभिवादन असेल.