बीड दि.१४ (प्रतिनिधी)-बीड जिल्हा हरित करायचा चांगला उद्देश घेऊन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीस लाख वृक्षारोपण मोहिमेला उपस्थिती लावली,मात्र आता जिल्हा प्रशासनाला(Beed Collector) ही मोहीम म्हणजे केवळ 'इव्हेन्ट'(Event)करायचा होता असेच चित्र आहे.एकाच दिवशी तीस लाख झाडे लावल्याचा विक्रम(Indian book of records) बीडच्या जिल्हा प्रशासनाने नोंदवून घेतला,अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र आणि शाबासकी मिळविली,आता मात्र लावलेल्या झाडांचे पुढे काय होते याची चिंता करायला कोणीच तयार नाही.त्यामुळे अजित पवारांच्या उपस्थितीत लावलेल्या झाडांनी आठवडाभरातच माना टाकायला सुरुवात केली आहे.त्यामुळे प्रशासनाला केवळ रेकॉर्डच नोंदवायचा होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यात सध्या प्रशासकीय पातळीवर फक्त उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्यासमोर 'शो' करण्याची जणू स्पर्धा सुरु आहे.त्यातूनच वेगवेगळ्या इव्हेंटच्या कल्पना राबविल्या जात आहेत.असाच एक मोठा इव्हेन्ट अजित पवारांच्या मागच्या दौऱ्यात केला गेला.एकाच दिवशी ३० लाख झाडे लावण्याची मोहीम( Tree plantation record)प्रशासनाने जाहीर केली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये म्हणे त्याची नोंद देखील झाली.आता या नोंदी प्रत्यक्ष झाडे पाहून झाल्या का केवळ प्रशासनाने सांगितले आणि खाजगी यंत्रणा असलेल्या संबंधित 'रेकॉर्ड' वाल्यांनी त्याची नोंद घेतली हे प्रशासनच जाणो.
मात्र मोठ्या अट्टाहासाने,जिल्हाभरातून विद्यार्थी बोलावून अजित पवारांच्या उपस्थितीत जेथे झाडे लावली गेली,त्या झाडांची सुरक्षा किंवा संवर्धन याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.अद्याप या वृक्षारोपण मोहिमेला आठवडाच झाला आहे, तेवढ्यातच खंडोबा मंदिर,खंडेश्वरी मंदिर परिसरातील झाडे माना टाकू लागली आहेत.त्यामुळे मग मोठ्या हौसेने लावलेल्या झाडांचे पुढे असेच होणार का आणि प्रशासन अजित पवारांची देखील अशीच दिशाभूल करणार का अशा चर्चा सध्या सुरु आहेत.
अत्यंत कमी खोलीचे खड्डे
मुळातच सदर वृक्षारोपण मोहिमेत झाडे लावणे आणि जगविण्यापेक्षा 'जे इतर कोणत्याच जिल्ह्याला जमले नाही ते' करून दाखविण्याचाच प्रयत्न अधिक झाला, त्यात पुन्हा देशपातळीवरचे रेकॉर्ड करण्यासाठीचा अट्टाहास,त्यातून मग तुतीला वृक्ष ठरविले गेले,त्यातील तुतीची किती झाडे आता ४ वर्षांनी शिल्लक राहतील हा भाग वेगळा, पण ते पाहायला काही सध्याचे अधिकारी असणार नाहीत.त्यासोबतच 'एकाच दिवसात तीस लाख'चे टार्गेट साध्य करण्यासाठी केवळ उरकण्याचा कार्यक्रम झाला, त्यामुळे बहुतांश ठिकाणी रोपांसाठी खोदलेले खड्डडे अत्यंत कमी खोलीचे खोदण्यात आले आहेत.तेथे झाडांची मुळे रुजणार कशी हा देखील प्रश्नच आहे
अनेक खड्डे रिकामेच
आमच्याकडे प्रत्येक सर्व्हे क्रमांकाची माहिती आहे, कोणत्या ठिकाणी कोण झाड लावणार याची यादी तयार आहे आणि अशा अनेक गोष्टी जिल्हा प्रशासनाने सांगितल्या होत्या.कदाचित रेकॉर्ड नोंदविण्यासाठी म्हणून तितके खड्डे देखील खोदण्यात आले असतील, मात्र आज घडीला त्यातील अनेक खड्डे रिकामेच असल्याचे चित्र आहे.जेथे लोकांचा वावर त्याठिकाणची अवस्था अशी असेल तर जेथे लोकांना सहज जात येत नाही,अशा वन क्षेत्राची परिस्थिती कशी असेल याची कल्पना न केलेली बरी.