बीड विधानसभेचे युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, अजित पवारांनी आम्हाला राष्ट्रवादी परिवारात सामावून घेतले. स्व.केशर काकू, माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ज्या पक्षात हयात घालवली, त्या पक्षात आल्याने कुटुंबातच आल्याची भावना आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. बीडमध्ये झालेल्या शरद पावरांच्या सभेत इथले भ्रष्ट आणि निष्क्रिय आमदार विकासाबाबत चकार शब्द बोलले नाहीत. धनुभाऊंनी २०१९ मध्ये बीडमध्ये दिवा लावला, मात्र या दिव्याचा उजेड कुठेही पडला नाही. त्याचे चटके मात्र आम्हाला आणि जनतेला बसले.
जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला असून दुष्काळजन्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी. तसेच, २०२० चा प्रलंबित पीकविमा मिळावा. पूर्वी मागेल त्याला शेततळे दिले, आता मागेल त्याला शेतीला कंपाऊंड वॉल द्यावे, जेणेकरून शेती पिकांचे हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण होईल. बीडमध्ये मेडिकल कॉलेज व्हावे. चौसाळा, बीड येथे शासकीय गोदाम उभारावेत. तरुणांसाठी जिमनेशियम मिळावेत. बीड शहरातील पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम रखडले आहे. पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. हद्दवाढ भागासह नगरोत्थान योजनेतील रस्त्याची कामे, खासबाग -मोमीनपुरातील पुलावरील बंधारा, शहरातील मुख्य रस्त्याचे बीड बायपासचे स्लीप रोड, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नगर - परळी रेल्वे मार्ग, बॅरेजेस, बीडची धाकटी पंढरी नारायणगडासाठी भरीव विकासनिधीचा प्रश्न मार्गी लावावा. बीड मतदारसंघातील उर्वरित प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, २०१९ मध्ये बीडच्या आमदारांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून पॅड घेतले, अमरसिंह पंडितांकडून हॅन्ड ग्लोज घेतले, अजित पवारांचे हेल्मेट घेतले आणि धनुभाऊंच्या सैराट बॅटने झिंगाट होऊन सिक्स मारला होता, त्यानंतर ते बुंगाट होऊन पळून गेले, आज जनता त्यांना शोधतेय. त्यांच्यामुळे चार वर्षात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष अजितदादांच्या माध्यमातून आता एक-दीड वर्षात भरून काढायचा आहे. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत या झिंगाट बॅट्समनला झिरोवर आउट करायचे आहे. त्यासाठी आमचे सहकारी राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील, फक्त आम्हाला ताकद द्या, अशी अपेक्षा युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व्यक्त केली.