Advertisement

जबरी चोरीतील आरोपींच्या ४८ तासात आवळल्या मुसक्या

प्रजापत्र | Wednesday, 07/01/2026
बातमी शेअर करा

आष्टी दि.७ (प्रतिनिधी)-तालुक्यातील सराटेवडगाव येथील शेळके वस्तीवर ४ जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या जबरी चोरीच्या घटनेचा अंभोरा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. १७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने १५० किलोमीटरची शोधमोहीम राबवून, चोरीतील दोन सख्ख्या भावांना त्यांच्या घरातून अटक केली. अक्षय गारमन चव्हाण (२३) आणि रिजवान गारमन चव्हाण (२०, रा. शेरी बुद्रुक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून गुन्हेगारीतून झटपट श्रीमंत होण्यासाठी सख्या भावांनी दरोड्याचा रस्ता निवडल्याचे समोर आले आहे. 
सराटेवडगाव येथे ग्यानबा राजपुरे यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी मारहाण करत दागिने आणि रोकड लंपास केली होती. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी तातडीने तपासचक्र फिरवून सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण केले. चोरटे आष्टी तालुक्यातील शेरी येथील असल्याची खात्री पटताच, मंगळवारी पहाटे पोलिसांनी आरोपींच्या घराला वेढा घातला. आरोपी गाढ झोपेत असतानाच पोलिसांनी त्यांच्या दारात उभे राहून मुसक्या आवळल्या.

 

चोरटे झाले हुशार 
पोलीस तपासात चोरट्यांची एक धक्कादायक पद्धत समोर आली आहे. चोरीला जाताना हे आरोपी स्वतःचे मोबाईल दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात ठेवतात, जेणेकरून त्यांचे लोकेशन सापडू नये. गुन्ह्यासाठी ते वेगळी सिमकार्डे आणि मोबाईल वापरतात. मात्र, अंभोरा पोलिसांनी १५० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या हुशारीला मात दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश साळवे आणि त्यांच्या पथकाने केली. फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध आता पोलीस घेत आहेत.

 

Advertisement

Advertisement