Advertisement

लोक घरात बसले तरच बिबट्या टप्प्यात येईल

प्रजापत्र | Tuesday, 01/12/2020
बातमी शेअर करा

शिकार केल्यावर चार दिवस शांत राहतो बिबट्या

आष्टी : आष्टी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाची पथके डोळ्यात तेल घालून दक्ष आहेत. मात्र बिबट्या अजूनही टप्प्यात आलेला नाही. बिबट्याने एकदा शिकार केली तर तो त्या शिकारीवर चार दिवस शांत राहू शकतो त्यामुळे आता बिबट्याला वनविभागाच्या टप्प्यात आणायचे असेल तर लोकांनी घरात राहणे गरजेचे असेल. लोक बिबट्याच्या टप्प्यात गेले नाही तरच बिबट्या वनविभागाच्या पिंजर्‍यात अडकू शकतो त्यामुळे बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पुढचे सात आठ दिवस तरी लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
आष्टी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. आतापर्यंत या बिबट्याने तीन बळी घेतले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी पिंजरे लावले आहेत. मागच्या दोन दिवसात पिंजर्‍याची संख्या वाढविण्यात आली आहे. तरीही हा बिबट्या अजूनही वनविभागाच्या टप्प्यात यायला तयार नाही त्यामुळे आता नागरिकांनी स्वत: बिबट्याच्या टप्प्यात जावू नये. सात आठ दिवसतरी काळजी घ्यावी असे सांगितले जात आहे.

 

अनेक जिल्ह्यात असतो बिबट्याचा अधिवास
आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातलेला असला तरी बीड जिल्ह्याला बिबट्या नवीन नाही. यापूर्वी देखील अनेक ठिकाणी अनेकांना बिबट्याचे दर्शन झालेेले आहे. वनविभागाकडील एका माहितीनूसार बीड जिल्ह्यात दहाहून अधिक बिबट्यांचा अधिवास अनेक वर्षांपासून आहे. डोंगरकिन्ही परिसर आणि नायगाव अभयारण्याच्या भागात तीन बिबट्यांचा अधिवास असल्याचे सांगितले जाते. या परिसरात बिबट्यांनी एकदा गायीवर तर अनेकदा काही प्राण्यांवर हल्ले केले मात्र या परिसरातील बिबट्यांनी मानवावर हल्ले केले नव्हते. त्यामुळे सध्या आष्टी परिसरात असलेला बिबट्या इतर जिल्ह्यातून आलेला असावा असे सांगितले जाते.

एका रात्रीत किती फिरतो बिबट्या ?
आष्टी तालुक्यात वेगवेगळ्या गावात बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याचवेळी शिरुर तालुक्यातही बिबट्याला पाहिल्याचे लोक सांगत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात नेमके किती बिबटे आले आहेत. याची चर्चा सुरु आहे. मात्र एक बिबट्या एका रात्री शंभर किमीचा प्रवास सहज करु शकतो अशी माहिती आहे. यापूर्वी बिबट्या नेमका किती प्रवास करु शकतो याचा एक प्रयोग वनविभागाने केला होता. त्यावेळी बिबट्याने संपूर्ण नाशिक शहराला वेढा घातला होता.

 

तो बिबट्या नव्हे तर तडस.
माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात बिबट्या दिसल्याचे सांगितले जात होते. मात्र सावरगाव परिसरात दिसलेला प्राणी बिबट्या नसून तडस असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

 

वाघाचा माग सोपा, बिबट्याचा अवघड .
वनविभागाची पथके मागच्या चार दिवसांपासून बिबट्याचा शोध घेत आहेत. मात्र त्यांना बिबट्याचा माग लागायला तयार नाही. जे लोक वाघाचा माग काढतात त्यांना बिबट्या का सापडत नाही हा प्रश्‍न सर्वांसमोरच आहे. सरकार प्रत्येक वाघाला बेशुध्द करुन त्यांच्या शरिरात जीपीएस बसविते त्यामुळे डेहराडून येथील केंद्रातून प्रत्येक वाघाच्या हलचालीवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे वाघाचा माग काढणे एकवेळ सोपे असते. बिबट्याच्या बाबतीत आतापर्यंत जीपीएस बसविण्याचा प्रयोग करण्यात आलेला नाही. बिबट्यांची संख्या भरपूर असल्याने आतापर्यंत बिबट्याला फारसे गांभीर्याने घेतले गेले नव्हते. आणि बिबट्या लपून बसल्यास त्याचा माग काढण्याची कुठलीच यंत्रणा सध्या नाही. त्यामुळे सर्व पथकांना बिबट्या टप्प्यात येण्याची वाट पहात बसावी लागत आहे.

का आवडते मानवी रक्त ?
बिबट्या सहसा तृणभक्षी प्राणी खातो. एखाद्या मनुष्याला बिबट्याने फाडून खाल्ल्याचे प्रकार अपवादात्मक घडतात. तृणभक्षी प्राण्यांच्या रक्तामध्ये क्षारांचे प्रमाण नगण्य असते. उलट मानवी रक्ताची चव खारट लागते. त्यामुळेच एकदा बिबट्याने मानवी रक्त किंवा मांस चाखले तर ही चवच बिबट्याला पुन्हा मानसांवर हल्ले करायला प्रवृत्त करते. मात्र एकदा शिकार केल्यानंतर बिबट्या किमान चार दिवस पुढीची शिकार करत नाही असे वन्य जीव अभ्यासकांचे मत आहे. 

 

शूटआऊट नाही सोपे 
मागच्या दोन दिवसांपासून बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालाव्यात अशी मागणी होत आहे. लोकप्रतिनिधी देखील तिच मागणी करत आहेत. मात्र बिबट्याचे ‘शूट आऊट’ करणे तितके सोपे नाही. वाघाच्या बाबतीत जी प्रक्रिया राबवावी लागते तीच प्रक्रिया बिबट्यासाठीही राबवावी लागते. जोपर्यंत एखादा वाघ किंवा बिबट्या आठ बळी घेत नाही तोपर्यंत त्याच्या शूट आऊटचा प्रस्ताव देता येत नाही. आठ बळी घेतल्यानंतर वनविभागाकडून केंद्रसरकारकडे त्याच्या शुट आऊटचा प्रस्ताव जातो आणि त्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकारला व राज्यसरकार वनविभागाला पुढील निर्देश देते. 

 

जुन्नरचे पथक दक्ष

महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात बिबट्याचंा सर्वाधिक वावर असलेला परिसर म्हणून जुन्नरची ओळख आहे. या भागातील वनरक्षकांना बिबट्याला ट्रॅन्क्युलाईज (बेशुध्द) करण्याचा मोठा अनुभव आहे. तसेच हे पथक बिबट्याचा माग काढण्यातही अनुभवी मानले जाते. या पथकाकडे खास बिबट्याचा माग काढणारे श्‍वान पथक आहे. जुन्नरचे हे पथक आष्टीत डेरे दाखल झाले आहे. मात्र या पथकालाही अजून बिबट्याचा माग लागलेला नाही.

हेही वाचा 

पंकजा मुंडेंची बिघडली तब्येत;होम आयोसेलट घेतला निर्णय

 

Advertisement

Advertisement