बीड दि.३१ (प्रतिनिधी): शेत रस्ता बंद करण्यात आल्याने परिसरातील शेतकर्यांना जाण्या येण्यास रस्ता नाही. रस्ता खुला करावा अशी मागणी शेतकर्यांनी तहसिलदार व अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे कडूनही रस्ता खुला केला जात नसल्याने आज गुरुवार (दि.३१) रोजी शेतकर्यांनी आडस येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
आडस येथील सर्व्हे नं. २८९ क्षेत्रामध्ये जुना निजाम कालीन ३३ फुटी रस्ता होता. मात्र सदरील हा रस्ता बंद करण्यात आला. रस्त्याच्या संदर्भात केज तहसिलदार व अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल प्रशासन घेत नसल्याने आज शेतकर्यांनी आडस येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी दशरथ योगीराज आकुसकर, पुरूषोत्तम तागड, बाबु ढवळे, महादेव तागड, बागवान या शेतकर्यांचा सहभाग होता. दुपारपर्यंत हे आंदोलन सुरू होते.