बीड दि.१५(प्रतिनिधी): खोट्या(Beed) तक्रारी करणे अंगलट आले असून अशा फसव्या फिर्यादीदारांवर बीड जिल्ह्यात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये खोट्या तक्रारी करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
केज तालुक्यातील तरनळी येथील अंगद अनंत खेडकर याने १३ जुलै २०२५ रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याने सांगितले होते की, साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीसाठी उचल घेत गावाकडे जात असताना मोटारसायकलवर(Beed police) आलेल्या तिघांनी त्याचा पाठलाग करून त्याला रस्त्यात अडवले. शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील १,७५,००० रुपये हिसकावले, अशी माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी तपासाअंती हा प्रकार पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न केले. त्यामुळे त्याच्यावर कलम २१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत मोरेवाडी (ता. अंबाजोगाई) येथील विठ्ठल श्रीहरी माळी याने डायल ११२ वर कॉल करून खोटी माहिती दिली की, अंबाजोगाई येथील धोंडीराम चव्हाण आणि बरकते यांनी त्याचे अपहरण करून त्याला मारहाण केली व पाय मोडला आहे. यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता सदर इसमाने खोटा आरोप केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्यावरही धारुर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५१/२०२५, कलम २१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या प्रकरणात शेरी (ता. आष्टी) येथील सानप शास्त्री भोसले याने ०९ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अॅट्रॉसिटी प्रकरणासाठी उपोषण सुरू केले होते. पोलीस निरीक्षकांनी त्याला तक्रार देण्यासाठी बोलावले असता त्याने पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र हा प्रकार पूर्णतः खोटा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. हा वाद फक्त पैशांच्या व्यवहारातून उद्भवलेला होता.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्पष्ट केले की, अशा खोट्या तक्रारींमुळे निरपराध लोकांना त्रास होतो आणि खऱ्या तक्रारींचीही बदनामी होते. यापुढे अशा फसव्या तक्रारी करणारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाला वेठीस धरून पोलीस यंत्रणेची दिशाभूल करणे, निरपराधांना अडचणीत आणणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.