Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - ही घराणेशाहीच् घातक

प्रजापत्र | Friday, 13/01/2023
बातमी शेअर करा

महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात काँग्रेसच्या सत्ताकाळात पक्षाचे मूळ असंघटन फारसे वाढले नाहीच, वाढली ती पक्षाची घराणी. पक्षाने देखील अशा घराण्यांनाच बळ दिले. अगदी पक्षांतर्गत निवडणुकीत देखील नेत्यांचे दिवटेच पुढे येत गेले. त्यामुळे एकदा का ते घराणे पक्षापासून बाजूला सरकले , की मग त्या भागात पक्षाचे हाल होणारच , त्यामुळे मग कसेही करून ते घराणे जपायचे असेच धोरण काँग्रेसचे राहिले आणि असल्या घराणेशाहीनेच आजपर्यंत काँग्रेसचा गळा आवळला आहे. आता तांबे प्रकरणावरून पक्षाला पुन्हा याचाच अनुभव आला आहे.
 

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतरही सुधीर तांबे यांनी अर्जच भरला नाही आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. आता सत्यजित तांबेंच्या उमेदवारीला भाजप समर्थन देणार आहे. म्हणजे एका अर्थाने सत्यजित तांबे भाजपच्याच वळचणीला गेले आहेत. सत्यजित तांबे काय किंवा सुधीर तांबे काय , या कुटुंबाला काँग्रेसने खूप काही दिले. सत्यजित तांबे ज्यावेळी एनएसयूआय किंवा युवक काँग्रेसच्या निवडणुका लढवायचे , त्यावेळी देखील राज्यभरातून संस्थानिकांची फौज त्यांच्यासाठी झटायची. आता त्याच तांबेंना काँग्रेस पक्षाकडून विजयाचा विश्वास वाटायला तयार नाही, म्हणूनच त्यांनी अपक्ष उमेदवारी भरली आणि सुधीर तांबेंनी एबी फॉर्म घेऊनही अर्जच भरला नाही. आता त्या मतदारसंघात ऐनवेळी काँग्रेसचो गोची झाली आहे . हे केवळ नाशिकमध्ये घडत आहे असेही नाही, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात भाजपने ज्यांना उमेदवारी दिली, ते किरण पाटील यांचीही पाळेमुळे काँग्रेसचीच , आजही किरण पाटलांच्या दिमतीला असणारी जी फौज आहे, त्याला बहुतांश रसद काँग्रेसकडूनच होते . असेच जर चित्र असेल तर काँग्रेस सावरणार तरी कशी?
मुळात या देशात काँग्रेसला मोठा जनाधार होता. या जनाधारातून पक्षाने खर्‍या अर्थाने संघटन वाढवायला हवे होते. पण पक्षाचे संघटन कधी वाढलेच नाही. पक्षाच्या सेवादलासारख्या व्यवस्थेतून कार्यकर्त्यांचे खत झाले आणि एनएसयूआय, युवक काँग्रेसमध्ये पक्षाच्या नेत्यांची पुढची पिढीचं पुढे येऊ लागली. सामान्य कार्यकर्त्याला शक्ती देण्याऐवजी पक्षाने पोसली ती नेत्यांची राजकीय घराणी. बाप किंवा आई आमदार खासदार , त्यांच्या मुलाला झेडपीच्या उमेदवारी, जमलं तर अध्यक्षपद किंवा सभापतीपद, नगरपालिकेची उमेदवारी त्यांच्याच घरात , या नेत्यांनाच कारखाने, दूधसंघ , बँका , म्हणजे पक्षाची सारी ताकत एकाच घरात. मागच्या अनेक दशकात पक्षाने हेच धोरण ठेवले. त्यामुळे सामान्य कुटुंबातील लोकांना पक्षात केवळ ’जय ’ म्हणण्यापुरतीच संधी असेच चित्र सातत्याने राहिले. त्याचा परिणाम पक्षाचे संघटन कधी झालेच नाही.
बरे जी घराणी काँग्रेसने पोसली, त्यांनी तरी काय केले, तर सत्तेतून स्वतःचे इमले उभे केले. हे करताना सत्तरच्या मस्तीत नियम पायदळी तुडविले. त्यातून त्यांचे साम्राज्य उभे राहिले. आता हे साम्राज्य टिकवायचे तर त्याला सत्तेची कवचकुंडले हवीतच . नाहीतर ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा फास आहेच. आज ईडी सारख्या यंत्रणांच्या माध्यमातून राजकारण करण्याची विकृत मानसिकता भाजपने पोसली असली, तरी भाजपच्या हाती ते कोलीत मिळाले ते काँग्रेसच्या घराणेशाहीमुळेच. पक्षाने पोसलेल्या या घराण्यांनी मग पटापट पक्ष सोडायला सुरुवात केली. महाराष्ट्रातच काय देशात हेच घडले. त्यामुळे आज काँग्रेस खिळखिळी झाली आहे .
ज्या नेत्यांना पक्षाने खूप काही दिले, त्या नेत्यांनीच पक्षाच्या नरडीला नख लावले. आज तांबे कुटुंबाने पक्षाला धक्का दिला, उद्या आणखी कोणी देईल. असेही रात्रंदिवस पक्ष श्रेष्ठींच्या सोबत असलेले आणि देशभर ’प्रभारी ’ असणार्‍या नेत्यांच्या जिल्ह्यात पक्ष वाढत नाही, आणि तेथे त्या नेत्यांची भाजपशी उघड युती असते , असली ’पाटीलकी ’ काँग्रेसमध्ये नवीन नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर आता लातूरचे देशमुख काय नांदेडचे चव्हाण काय , या आणि असल्या अनेकांना पक्षाने काय कमी केले, मात्र तरीही त्यांच्या पक्ष सोडण्याची चर्चा अधूनमधून होतेच, आणि ते त्याला विरोधही करीत नाहीत. ही केवळ काही नावे झाली. काँग्रेसमध्ये सर्वत्र हेच सुरु आहे. मात्र यातून पक्ष काहीच शिकायला तयार नाही. आता काही करायचे तर शून्यापासून सुरुवात करण्याची तयारी ठेवावी लागेल. मध्यंतरी राहुल गांधींनी ती मानसिकता केली होती, मात्र आता त्याच मानसिकतेवरून चालण्याची हिम्मत पक्ष दाखविणार का? तसे झाले तर प्रवास अवघड असेल, मात्र तसे काही करण्याची मानसिकता पक्षाने दाखविली नाही तर मात्र पक्षाला तांबेंसारखे धक्के सोसावेच लागतील.

Advertisement

Advertisement