सोलापूर: मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने (Wife)पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाला शेतातील कडब्यात जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.किरण उर्फ गुडू नागेश सावत (वय २१) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पाठकळ (ता. मंगळवेढा) येथे राहत होत्या. त्यांचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले होते. पती नागेश सावत याचा हॉटेल व्यवसाय होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री किरण घरी आपल्या मुलीला झोपवत होती. पती नागेश घरी येण्याची त्या वाट पाहत होत्या. नागेश नेहमी रात्री ११ च्या सुमारास घरी येत असत. त्या रात्री घरी आल्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भांडणाचा राग नागेशच्या मनात होता. त्यामुळे त्याने पत्नी किरणला मारहाण केली. काही वेळातच शेतातील कडब्यामध्ये आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांना दिसले. पण आगीच्या वेळी कोणाचाही आवाज ऐकू आला नाही, (Murder) असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.किरणला मारून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या पतीने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. किरणच्या चुलत्याला पहाटे साडेतीन वाजता घटनेची माहिती देण्यात आली. किरणचे माहेर पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव आहे.
दरम्यान, नागेशने किरणला का मारले याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी पती नागेश सावतला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. "तिला मारून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला," असे किरणच्या कुटुंबियांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.