Advertisement

राज्यकर्ती जमातचा अर्थ

प्रजापत्र | Thursday, 05/01/2023
बातमी शेअर करा

वंचित बहुजन आघाडीची मोट ज्यांनी बांधली ते प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार हे लक्षात येताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंनी अगदीच घाईत  रिपिब्लकन नेते जोगेंद्र कवाडे यांना आपल्यासोबत घेतले. यापूर्वीच राज्यातील आंबेडकरी अनुयायांमध्ये मोठा जनाधार असलेले रामदास आठवले 'भीमशक्ती शिवशक्तीच्या ' नावाखाली भाजपसोबत गेलेले आहेतच. त्यामुळे जेव्हा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात असे चित्र निर्माण झाले होते, त्याचवेळी आंबेडकरी विचारधारा सांगणाऱ्या कोणत्या तरी नेत्याला आपल्यासोबत घ्यावे लागेल यासाठी भाजप कामाला लागला होताच. आता रामदास आठवले स्वतः भाजपसोबत असल्याने, त्यांनी कवाडेंना शिंदे  सेनेसोबत पाठविले असावे. प्रकाश आंबेडकर यांनी मागच्या काही निवडणुकांमध्ये आपला 'प्रभाव ' दाखवून दिलेला आहे , त्यांच्या 'वंचित' मुळे अनेकांचा  झालेला पराभव राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का देणारा ठरला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर उद्या शिवसेनेसोबत आणि त्या माध्यमातून महाविकास आघाडीसोबत आले तर त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल. त्या तुलनेत जोगेंद्र कवाडेंना आपला जनाधार आणखी सिद्ध करायचा आहे. अर्थात प्रकाश आंबडेकर काय किंवा जोगेंद्र कवाडे , रामदास आठवले काय , या नेत्यांमुळे इतर प्रस्थापित पक्षांचा फायदा होईलही , मात्र आंबेडकरी समूहाचे काय ?
बाबासाहेबानी ज्यावेळी आपल्या अनुयायांना 'जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा , की आपण राज्यकर्ती जमात आहोत ' असे सांगितले होते, त्यावेळी बाबासाहेबांना आंबेडकरी विचारधारेत दहा पाच नेत्यांचे पुढारपण अपेक्षित ,नव्हते  तर या समूहाची राजकीय शक्ती इतकी वाढावी की या समूहाचा विचार धोरण ठरविताना केला जावा आणि राजकारणाचे सूत्र या समूहाच्या हाती ,तऱ्हवी आणि त्यातून संपूर्ण समाजाचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक उत्थान वाहावे असेच अपेक्षित होते.
मात्र बाबासाहेबानाच्या विचारातून जो रिपाई पक्ष निर्माण झाला, त्याचे पुढे काय झाले हे सर्वज्ञात आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दादासाहेब रुपवते, यशवंत आंबेडकर , एन . शिवराज आदींनी ज्या रिपाईचे स्थापना केली होती, त्या रिपाईचे १९५७ लोकसभा निवडणुकीत ६ खासदार निवडणून आले होते. तेवढे यश त्यापुढे कधीच या पक्षाला मिळाले नाही. रिपाई एकत्रित असेल तर आंबेडकरी समूह खऱ्याअर्थाने एक राज्यकर्ती जमात ठरेल हे ओळखून त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्यांनी देखील या पक्षात फूट पडेल यासाठी भरपूर प्रयत्न केलेच , हे नाकारता येणारच नाही. आणि पुढे या एका पक्षाची अनेक शकले पडत गेली. कोणत्याही एका गटाच्या नेत्याला आपल्यासोबत घ्यायचे आणि राजकारण करायचे हे जसे काँग्रेसने , पुढे राष्ट्रवादीने केले, तेच भाजप आणि शिवसेनेने देखील केले. यातून महाराष्ट्रातील आंबेडकरी विचाराच्या समूहाची राजकीय शक्ती मात्र कमी होत गेली. देशपातळीवर ज्या समूहाकडे राजकीयदृष्ट्या सर्वात जागरूक समूह म्हणून  पाहिले जाते , त्या समूहाच्या स्वतःच्या शक्तीचे काय ? आज हा समूह इतरांची राजकीय शक्ती वाढविण्यासाठीच कारणी आहे. आंबेडकरी विचारधारेच्या समूहांचा आणि नेत्यांचा वापर आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी केला आहे. पण या समूहाला खरेच राज्यकर्ती जमात बनता आले का ? याचे उत्तर आजही नकाराथीच का आहे ? याचा विचार या समूहाने करायला हवा.
जे कांशीराम सुरुवातीच्या ८ वर्षाच्या काळात रिपाइंसोबत होते, ते कांशीराम उत्तरप्रदेश सारख्या कर्मठ राज्यात मागास समुदायाला राजकीय अस्तित्व मिळवून देतात, मात्र बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात इतर नेत्यांना आजही ते करता येत नाही , याचाही विचार करण्याची वेळ आहे. त्यामुळेच एकाने प्रकाश आंबेडकर सोबत घ्यायचे , दुसऱ्याने आठवलेंच्या गळ्यात गळे घालायचे तर कोणी कवाडेंना सोबत घ्यायचे, कोणी आणखी कोणते नेतृत्व जवळ करायचे , यातून आंबेडकरी विचारधारेच्या समाजाला काय मिळणार आहे ? समाजाचे नेते म्हणविणारे क्षणात आज एका पक्षासोबत तर उद्या दुसऱ्या पक्षासोबत जातात, त्यातून कोणाला सत्तेची खुर्ची मिळत असेलही , पण सामान्य समाजाचे काय ? आणि याचा विचार आता समाजानेच करायला हवा . 

Advertisement

Advertisement