मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांच्या गॅस एजन्सीच्या मॅनेजरने लाखोंचा गैरव्यवहार केल्याची बाब उजेडात आली आहे. या मॅनेजरला दरमहा 10 हजार रुपये वेतन आहे. पण त्याच्या खात्यात तब्ल 16 लाख आढळलेत. एवढेच नाही तर 4 बायकांच्या या दादल्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या मॅनेजरच्या चारही बायका इंदूर सारख्या शहरात 4 वेगवेगळ्या घरांत राहतात हे विशेष.
बनावट दस्तावेजांच्या मदतीने गैरव्यवहार
विजय शाह यांची खंडवा येथे दिव्य शक्ती नामक गॅस एजन्सी आहे. या एजन्सीचे असिस्टंट मॅनेजर बिशू भालेराव यांनी बनावट दस्तावेज तयार करून 16 लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. या प्रकरणी पोलिसांत विस्तृत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भालेराव सध्या फरार आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, बिशू भालेराव हा मंत्री शाह व त्यांच्या कुटुंबीयांचा अत्यंत विश्वासू व्यक्ती होता. त्याला दरमहा अवघे 10 हजार रुपयांचे वेतन होते. पण बनावट दस्तावेजांच्या माध्यमातून तो अक्षरशः कोट्यधीश बनला.
10 हजार वेतन, खात्यात 16 लाख
शाह यांच्या गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकपदी स्वतः मंत्र्यांच्या स्नुषा पद्मिनी दिव्यादित्य शाह आहेत. रामनगरात राहणारा बिंशू भालेवर एजन्सीत असिस्टंट मॅनेजर होता. गॅस एजन्सीचे कर्मचारी सुभाष केसनिया यांनी शुक्रवारी रात्री त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार भालेराव यांनी 1 एप्रिल 2020 ते 16 सप्टेंबर 2022 पर्यंत एजन्सीची लाखो रुपयांची फसवणूक केली. प्राथमिक तपासात आरोपीने 16 लाख 21 हजार 670 रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले आहे. त्याच्यावर भादंवि कलम 409, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.