बीड दि.२५(प्रतिनिधी): कापूस, सोयाबीन, तूर आदी शेतमालाची भाववाढ करावी या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचा शेतकरी हक्क मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन गुरुवार (दि.२५) रोजी दिले आहे.
लढा मातीसाठी म्हणून या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कापसाला १२ हजार, सोयाबीन ७ हजार, तूर १२ हजार प्रतिक्विंटल भाव द्यावा, कापूस ८ हजार १०० तर सोयाबीन ५ हजार ३२८ रुपये पेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, सी.सी. आय कडून होणारी अडवणूक थांबवुन खरेदी सुरळीत करण्यात यावी, विदेशातुन होणारी कापूस व सोयाबीन पिकांची आयात बंद करावी यासह विविध मागण्यासाठी शेतकरी पुत्रांनी आज गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता शेतकरी हक्क मोर्चा काढला आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मागील जवळपास महिनाभरापासून तयारी सुरू होती. सोशल मीडिया तसेच गावागावात बैठका घेऊन शेतकरी पुत्रांची जनजागृती सुरू होती. याचा मोठा फायदा मिळाला असून शेतकरी पुत्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर शेतकरी पुत्रांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.

