नाशिकमध्ये सलग 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीने रौद्रावतार धारण केला असून नदीला चौथ्यांदा पूर आला आहे.
पुण्यातही पावसामुळे जवळपास सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत. येत्या 3 ते 4 तासांमध्ये खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे 22 हजार ते 25 हजार क्युसेक विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे.
मंदिरे पाण्याखाली
गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढल्याने किनाऱ्यावरील सर्व मंदिरे पाण्याखील गेली आहेत. त्यामुळे देशभरातून नाशिकमध्ये पुजेसाठी तसेच पिंडदान करण्यासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच, नदीकिनाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचाही इशारा दिला आहे.
...तर विसर्ग आणखी वाढणार
गंगापूर धरणातून 7 हजार 389 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. तर, अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. गंगापूर प्रमाणेच दारणा, कडवा, पालखेड धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी, दारणा, कादवा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवणार असल्याची माहीती प्रशानसनाने दिली आहे.
पुण्यातही मुसळधार
नाशिकप्रमाणेच पुण्यातही मुसळधार पावसामुळे धरणे काठोकाठ भरली आहेत. खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे येत्या 3 ते 4 तासांमध्ये खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे 22 हजार ते 25 हजार क्युसेक विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवावीत, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा
नाशिक व पुण्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.