Advertisement

नोटा खोक्यात ठेवल्या; पाणी शिरल्याने 42 लाखांचा झाला लगदा

प्रजापत्र | Friday, 16/09/2022
बातमी शेअर करा

कानपूर: आपला पैसा सुरक्षित राहावा म्हणून लोक बँकेत पैसे आणि दागिने ठेवतात. बँकावरती भरोसा असल्यामुळेच लोक बँकेत आपली आयुष्याची पुंजी ठेवतात. पण बँकेत तुमचे पैसे खरोखरच सुरक्षित असतात का? उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) एक घटना उघडकीस झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर हो की नाही काय द्यावं हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरच्या (kanpur) पांडू नगरमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या (pnb bank) शाखेत एका बॉक्समध्ये (खोक्यात) 42 लाख रुपयांच्या नोटा ठेवल्या होत्या. या खोक्यात पाणी शिरल्याने यातील काही नोटांचा लगदा झाला आहे. त्यामुळे बँकेतील रकमांच्या सुरक्षिततेबाबतचे प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत.

 

 

तीन महिन्यांपूर्वी बँकेत या नोटा एका खोक्यात भरून ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, या खोक्यात पाणी शिरले. ते कुणालाही कळलं नाही. बँक कर्मचारी अधूनमधून नोटा पाहायचे. पण वर वर नोटा पाहिल्याने त्या सुरक्षित असल्याचं त्यांना दिसून येत होतं. मात्र, खोक्याच्या खालून पाणी शिरल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही.

 

 

तिजोरीत नोटा ठेवायला जागा उरली नव्हती. त्यामुळे खोक्यात नोटा भरून एका भिंतीला लागून ही खोकी ठेवली होती. एकूण 42 लाख रुपयांच्या नोटा या खोक्यात ठेवल्या होत्या. मात्र, पावसामुळे जमिनीला खाली पाणी लागलं. त्यामुळे खोक्यात खालून पाणी गेलं आणि नोटा भिजल्याने त्याचा लगदा झाला.

 

 

याच दरम्यान आरबीआयची एक टीम निरीक्षणासाठी बँकेत आली होती. या टीमने बँकेची पाहणी सुरू केली. तसेच खोक्यातील नोटांचा लगदा पाहून या अधिकाऱ्यांनी वरच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवला. त्यानंतर पीएनबीच्या व्हिजिलन्स टीमनेही या प्रकाराची चौकशी सुरू केली. तसेच नोटा सुरक्षित का ठेवल्या नाहीत असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

 

 

याप्रकरणी पीएनबी बँकेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. त्यात वरिष्ठ प्रबंधनक देवीशंकर, प्रबंधक आसाराम, चेस्ट ऑफिसर राकेश कुमार आणि वरिष्ठ प्रबंधक भास्कर कुमार भार्गव यांचा समावेश आहे.

 

 

देवीशंकर यांनी 25 जुलै रोजी पांडू नगर ब्रँचचा पदभार स्वीकारला होता. नोटांचा लगदा झाल्याची घटना त्यापूर्वीची आहे. दरम्यान, पीएनबीने या संदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही किंवा या घटनेला दुजोरा दिलेला नाही.
 

Advertisement

Advertisement