उत्तर प्रदेशातील बरेली येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने मोबाईल फोन चार्जिंगवर लावून तसाच सोडला. त्यानंतर अचानक फोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन बेडला आग लागली. यादरम्यान बेडवर झोपलेली आठ महिन्यांची निष्पाप चिमुरडी भाजली. त्यानंतर उपचारादरम्यान त्या बाळाचा मृत्यू झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पचुमी गावचे आहे. येथे राहणारा सुनील सोमवारी दुपारी शेतातून घरी परतला. यानंतर त्याने आपला फोन चार्जिंगला लावला आणि छपरावर लटकवून ठेवला. त्याखाली त्यांची आठ महिन्यांची मुलगी नेहा बेडवर झोपलेली होती. चार्जिंग सुरु असताना अचानक मोठा आवाज होऊन मोबाईलचा स्फोट झाला आणि तो बेडवर पडला. त्यामुळे बेडला आग लागली.
बेडला आग लागली आणि बाळ भाजू लागलं
बेडला आग लागल्याने त्यावर झोपलेलं बाळ भाजलं, ते रडू लागलं. तिचा आवाज ऐकून सर्वजण तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र तोपर्यंत तिची संपूर्ण पाठ आणि दोन्ही हात भाजले गेले होते. त्यानंतर बाळाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि आई धावत गेली
आठ महिन्यांच्या चिमुकलीची आई कुसुमने सांगितले की, ती बाहेर कपडे धुत असताना या बेडला आग लागली. बाळाच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि ती धावत बाळाजवळ गेली. जर तिला याबद्दल माहिती असती तर तिने मुलीला तिथे कधीच झोपवले नसते.