मुंबई : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन झाले आहे. मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यात गोटेगाव जवळील झोटेश्वर धाम येथे वयाच्या 99 व्या वर्षी स्वामी स्वरूपानंद यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती.
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे देश-विदेशात भक्त आहेत. मध्य प्रदेशमधील महाकौशल झोनमधील सिवनी जिल्ह्यातील दिघौरी येथे 2 सप्टेंबर 1924 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. नुकताच त्यांचा 99 वा वाढदिवसा साजरा करण्यात आला होता. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे 1982 मध्ये गुजरातमधील द्वारका शारदा पीठ आणि बद्रीनाथ येथील ज्योतिर मठाचे शंकराचार्य बनले. स्वामी शंकराचार्य सरस्वती यांच्या पालकांनी त्यांचे बालपणी पोथीराम उपाध्याय असे नाव ठेवले होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्म कार्य हाती घेतले. त्यांनी वेद-वेदांग आणि शास्त्रांचे शिक्षण काशी (उत्तर प्रदेश) येथे घेतले.
स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी स्वातंत्र्यलढ्यात देखील भाग घेतला होता. त्यांने 15 महिने तुरुंगवास भोगला. सरस्वती यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे नऊ महिने आणि मध्य प्रदेशात सहा महिने तुरुंगात काढले होते. शिवाय राम मंदिर लढ्यात देखील शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचा मोठा वाटा आहे.