गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या वरुणराजाने मात्र आता राज्यातील अनेक भागात हजेरी लावली असून, मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात आता येत्या काही दिवसांत पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने आज चांगलीच हजेरी लावली. याचबरोबर मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही चांगलाच पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने अनेक भागातील पिके करपण्यास सुरुवात झाली होती.
मात्र आता पाऊसाच्या सरी बरसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, येत्या गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
जोर वाढणार
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारपासून पावसाचा जोर आणखीणच वाढणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या 15 दिवसांपेक्षा अधिकच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
तुलनेत अधिकचा पाऊस
शुक्रवारपासून पावसाचा जोर अधिक वाढताना पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिकचा पाऊस झाला आहे. 1 ते 4 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात 16.6 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत 21.5 मिमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाला आहे.
पिकांना जीवदान
लातूर शहर आणि परिसरात तुफान पाऊस झाला आहे. शहरालगतच्या शेतामध्ये पाणीच पाणी साचले आहे. अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर लातूरमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तर तिकडे बीडच्या परळीत झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. एक तास विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तीन आठवड्यापासून पाऊस गायब झाल्याने शेताततल्या उभी पिक माना टाकू लागली होती. मात्र, काल झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे.