Advertisement

भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची ‘स्टारबक्स’च्या ‘सीईओ’पदी निवड

प्रजापत्र | Friday, 02/09/2022
बातमी शेअर करा

आणखी एका भारतीयाने आपल्या कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय कंपनीत अव्वल स्थान मिळवले आहे. दिग्गज कॉफी ब्रॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टारबक्सने गुरुवारी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ते आता हॉवर्ड शुल्त्झ यांची जागा घेतील.

 

 

नरसिंहन १ ऑक्टोबर रोजी कंपनीत रुजू होणार आहेत, तर शुल्त्झ हे एप्रिल २०२३ पर्यंत अंतरिम प्रमुख म्हणून कार्यरत राहतील, त्यानंतर ते स्टारबक्स संचालक मंडळाचे सदस्य म्हणून कायम राहतील.

 

 

स्टारबक्स संचालक मंडळाचे अध्यक्ष मेलोडी हॉबसन यांनी एका निवेदनात लक्ष्मण नरसिंहन यांना “प्रेरणादायी नेता” असे संबोधले आहे. “जागतिक ग्राहकाभिमुख व्यवसायांमध्ये धोरणात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा सखोल, व्यावहारिक अनुभव, त्यांना स्टारबक्सच्या वाढीला गती देण्यासाठी आणि आमच्यासमोरील संधी काबीज करण्यासाठी आदर्श पर्याय बनवतो,” असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम केले आहे –
५५ वर्षीय नरसिंहन यांनी लायसोल आणि एन्फामिल बेबी फॉर्म्युलाचे निर्माते यूके स्थित रेकिट बेंकिसर ग्रुपचे मुख्य कार्यकारी म्हणून काम केले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, स्टारबक्स बोर्डाचे अध्यक्ष मेलोडी हॉबसन म्हणाले, “कंपनीचा विश्वास आहे की आम्हाला आमच्या पुढील सीईओमध्ये एक असाधारण व्यक्ती मिळाली आहे.” त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामं केली आहेत.

 

 

स्टारबक्सने जारी केलेल्या निवेदनात नरसिंहन लंडनहून सिएटलला स्थलांतरित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर ते १ ऑक्टोबरपासून स्टारबक्समध्ये सीईओ म्हणून रुजू होतील. हॉबसन यांनी सांगितले की, स्टारबक्स बोर्डाने नरसिंहन यांना सहाय्य करण्यासाठी शुल्त्झ यांना एप्रिल २०२३ पर्यंत अंतरिम सीईओ म्हणून राहण्यास सांगितले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, नरसिंहन सीईओची भूमिका स्वीकारतील आणि १ एप्रिल रोजी कंपनीच्या संचालक मंडळात सामील होतील.

 

 

अनेक जबाबदाऱ्या सांभाळणार –
एका अहवालानुसार, नरसिंहन हे जगातील सर्वात मोठ्या कॉफी चेन कंपनीत सीईओ म्हणून अनेक जबाबदाऱ्या सांभाळतील. यापूर्वी, रेकिट बेंकिसर समूहाने एक निवेदन जारी केले होते की त्यांचे सीईओ लक्ष्मण नरसिम्हन हे तीन वर्षांच्या दीर्घ कार्यकाळानंतर सप्टेंबरच्या शेवटी पद सोडतील.

 

Advertisement

Advertisement