तक्रारीची योग्य दखल घेऊन कारवाई होत नसल्याने संतापलेल्या महिलेने थेट पोलिस आयुक्तालयात पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेनंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी धाव घेत आग विझवली. सध्या या महिलेवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमके प्रकरण काय?
गंगापूर तालुक्यातील मांडवा गाव येथे राहणाऱ्या सविता दीपक काळे (वय ३२) यांचे काही दिवसांपूर्वी शेजाऱ्यांसोबत वाद झाले होते. शिवाय वैयक्तिक कौटुंबिक वादामुळे देखील सविता त्रस्त होत्या. वारंवार होणाऱ्या वादामुळे सविता यांनी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत न्याय देण्याची मागणी केली. वारंवार मागणी करूनही तिच्या वैयक्तिक तसेच परिसरातल्या वादाची योग्य दखल घेतली नसल्याची त्यांची तक्रार होती.
आग विझवण्याचा प्रयत्न
न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या सविता यांची सहनशक्ती संपली. बाटलीत ज्वलनशील पदार्थ घेऊन त्या गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्या. आयुक्तालयाच्या पायऱ्यांवरच त्यांनी बाटली स्वतःच्या अंगावर ओतून काडी लावली. पाहता - पाहता सविता पेटल्या व एकच खळबळ उडाली. पोलिसानी धाव घेत आग विझवण्याच्या साहित्याने आग विझवली. नंतर त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस विभाग हादरला
घटनेने पोलिस विभाग मात्र हादरून गेला आहे. सर्व वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सविता जवळपास पन्नास टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलिस विभागातील काही पोलिस ठाण्याचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.