Advertisement

मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 29/08/2022
बातमी शेअर करा

मुंबई - पावसाळी अधिवेशनावेळी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सुभाष भानुदास देशमुख या उस्मानाबादच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला उपचारांसाठी जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना सुभाष यांनी साथ न दिल्याने त्यांचा सोमवारी अखेर मृत्यू झाला.

 

 

सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली.

 

 

या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी त्यांना  दुपारी मयत घोषित केले. जे.जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, देशमुख सीसीयू विभागात उपचार घेत होते, ते 45 टक्के भाजले होते.  देशमुख यांनी त्यांच्या गावाकडील जमीन हडपली असल्याच्या कारणावरून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.

Advertisement

Advertisement