Advertisement

29 ऑगस्टला अंबानी 5G सेवेची घोषणा करण्याची शक्यता

प्रजापत्र | Friday, 26/08/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : भारताच्या डिजिटल क्रांतीला गती देणारी 5G सेवा ऑक्टोबर 2022 या महिन्यात सुरु होणार आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स (reliance) कंपनीच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबांनी 5G बाबत मोठी घोषणा करु शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

 

येत्या 29 ऑगस्ट रोजी रिलायन्सची होणारी ही 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. यामध्ये अंबानी 5G सेवा कधीपासून उपलब्ध होईल याची घोषणा करणार कदाचित करु शकतात. त्यामुळे अवघ्या उद्योगविश्वाचं लक्ष हे रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे असणार आहे. 

 

 

भांडवली बाजारातला हा एक बडा उद्योग समूह आहे. खनिज तेलापासून, किरकोळ व्यापार क्षेत्रापासून ते सर्वत्रच या समूहाची गुंतवणूक पाहायला मिळते. इतकंच नव्हे तर कोरोना संकटातही याची कामगिरी दमदार राहिली आहे. या समूहाचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक असलेल्या मुकेश अंबानी नवनव्या क्षेत्रात विस्तारण्याची महत्वाकांक्षा बाळगतात. शिवाय शेअर बाजारातही रिलायन्सच्या शेअर्सची चांगली चलती आहे. अनेकांना शेअर्सने चांगला परतावा दिला आहे. त्यामुळेच आता या सभेतून नवी मोठी नवी घोषणा होणार का? याची रिलायन्सच्या सभासदांना आणि गुंतवणूकदारांना उत्सुकता लागली आहे.

 

 

5G सेवा सुरु होईल पण...
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 5G सेवा 12 ऑक्टोबरपासून सुरु होणार असं सांगितलं होतं. परंतू सर्वच दूरसंचार कंपन्यांकडून 5G सुविधा उपलब्ध होणार नाहीत अशी देखील माहिती आहे. सोबतच ऑप्टिक्स फायबरद्वारे कॉर्पोरेट कंपन्यांकरीता पहिल्यांदाचा सेवेचा शुभारंभ होणार की थेट सामान्यांना 5Gचा लाभ मिळणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही आणि सर्वच कंपन्यांकडून सध्या 5G तंत्रज्ञानाच्या डिव्हाइसेसचे बदल समजून घेण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत संभ्रम कायम आहे.

 

 

पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन..
आशियातील सर्वात मोठी डिजिटल तंत्रज्ञान संघटना 'इंडियन मोबाइल काँग्रेस'च्या परिषदेची घोषणा करण्यात आली आहे. 1 ते 4 ऑक्टोबर 2022 दरम्यान इंडियन मोबाइल काँग्रेसची ही परिषद होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १ आॅक्टोबर रोजी याचे उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती आहे आणि याचवेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडियन मोबाईल कांग्रेसच्या परिषदेमध्येच 5G सेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.

 

 

रिलायन्सकडून जिओला सर्वाधिक बोली..
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी 5G मुळे भारताची डिजिटल क्रांती होईल,  विशेषत: शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, उत्पादन आणि ई-ऑपरेशन यासारख्या क्षेत्रांना जास्त मदत होईल असं म्हटलं होतं. 5Gच्या लिलावाच्या या फेरीत रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली होती. या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. कंपनीने पाच बँडमध्ये 24,740 मेगाहर्ट्झ रेडिओ लहरींसाठी 88,078 कोटी रुपयांची बोली लावली होती.

 

 

त्यामुळे आता रिलायन्स समूहाच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत अंबानीकडून काय घोषणा करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. ट्विटर, फेसबुक, युट्यूब या सोशल मीडिया अकाउंटवरुन सभासदांना सभेमध्ये सहभागी होता येईल.

Advertisement

Advertisement