गेवराई-जय भवानीच्या कार्यक्षेत्रातील नोंद असलेल्या बहुतांश ऊसाचे गाळप झाले असून बिगर नोंदीच्या ऊसाचे गाळप सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक जय भवानी गाळप करत असून कार्यक्षेत्रातील सर्व उभ्या ऊसाचे गाळप होईल असा विश्वास चेअरमन अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. हिंगणगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याप्रती संवेदना व्यक्त करताना पंडित म्हणाले, शेतकर्यांनी संयम राखणे गरजेचे असून कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन त्यांनी केले. जय भवानीकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाला योग्य ती मदत केली जाईल असेही अमरसिंह पंडित यांनी सांगितले.
गेवराई तालुक्यातील मौजे हिंगणगाव येथील नामदेव आसाराम जाधव या शेतकरी आत्महत्येच्या घटने बाबत जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दुःख व्यक्त केले. या बाबत बोलताना ते म्हणाले की, मौजे हिंगणगाव येथे १०१ हेक्टर ८० आर क्षेत्रावरील ऊसाची नोंद जय भवानीकडे होती, नोंद असलेल्या सर्व ऊसाचे गाळप जय भवानीकडून करण्यात आले असून बिगर नोंदीच्या २५ हेक्टर क्षेत्रापैकी ३ शेतकर्यांचा केवळ २ हेक्टर ऊस गाळपा अभावी शिल्लक राहिला होता, यामधील ४० आर म्हणजे १ एकर ऊस मयत शेतकरी नामदेव जाधव यांचा होता. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्याही ऊसाचे गाळप होणार होते, मागील वर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याने त्यांच्या ऊसाचे गाळप केले होते मात्र यावर्षी गंगामाई शुगर्सने त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला नाही अशी माहिती देवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाविषयी पंडित यांनी संवेदना व्यक्त केल्या.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याने अतिशय प्रतिकुल परिस्थितीत कारखाना सुरु करून आजवर ५ लाख ७२ हजार मेट्रीक टन ऊसाचे विक्रमी गाळप केले आहे. कार्यक्षेत्रातील नोंदीच्या ऊसाबरोबरच बिगर नोंदीचा ऊसही गाळप करण्याचे नियोजन कारखान्याने केले आहे. सुमारे १८ साखर कारखान्यांकडून दरवर्षी जय भवानीच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप केले जात होते, मात्र अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या कारखान्याने गेवराई तालुक्यातील ऊस उत्पादकांना अक्षरशः वार्यावर सोडले, त्यामुळे काही अंशी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता, परंतु या परिस्थितीतूनही मार्ग काढण्याचे काम सुरु असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप जय भवानी पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना अमरसिंह पंडित यांनी कोणीही ऊसाचे राजकारण करू नये असा सज्जड इशाराही यानिमित्ताने राजकीय विरोधकांना दिला.