अंबाजोगाई दि.२२(प्रतिनिधी): तालुक्यातील सायगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीर पिस्तूलमधून गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाला बर्दापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी परदेशी बनावटीची दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सायगाव येथे बुधवार (दि.२१) रोजी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी याने आपल्या ताब्यात बेकायदेशीररीत्या विनापरवाना अग्नीशस्त्रे बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गोळीबार केला. शांत असलेल्या सायगाव परिसरात अचानक गोळ्यांच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले होते. या घटनेची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे सपोनि श्री.कांबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची आणि घटनास्थळाची झडती घेतली असता त्याच्याकडे ‘Made in USA’ बनावटीची ९ एमएम पिस्टल, ‘Made in Japan’ बनावटीची चांदीच्या रंगाची रिवॉल्वर आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस स्टार सिटी मोटारसायकल क्रमांक एमएच २३ आर ०३१७ ही देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.आरोपी सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर आरोपीने ही घातक परदेशी बनावटीची शस्त्रे कोठून आणली आणि गोळीबार करण्यामागचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत.

