Advertisement

चोरीला गेलेला मोबाईल अवघ्या तासाभरात शोधला

प्रजापत्र | Thursday, 22/01/2026
बातमी शेअर करा

कडा दि.२२(वार्ताहार ): "पोलिस केवळ गुन्हेगारांचा बंदोबस्त करत नाहीत, तर ते गरिबांचे अश्रू पुसण्याचे कामही करतात," याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात आला. उदरनिर्वाहासाठी सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथून आष्टी तालुक्यात मजुरीसाठी आलेल्या एका मजुराचा मोबाईल चोरीला गेला होता. पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने तांत्रिक तपास करत अवघ्या तासाभरात तो मोबाईल शोधून दिला आणि मजुराच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले.

      सिल्लोड येथील रहिवासी अब्दुल रेहमान पठाण हे पोटाची खळगी भरण्यासाठी आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे मजुरीसाठी आले आहेत. बुधवारी दुपारी जेवण केल्यानंतर त्यांचा मोबाईल चोरीला गेला. हातावर पोट असलेल्या अब्दुल यांच्यासाठी मोबाईल म्हणजे आपल्या गावी असलेल्या कुटुंबाशी संपर्काचा एकमेव दुवा होता. तोच हरवल्याने ते अत्यंत हवालदिल झाले होते.गुरुवारी सकाळी अब्दुल यांनी अंभोरा पोलीस ठाणे गाठले आणि सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. घटनेचे गांभीर्य आणि तक्रारदाराची परिस्थिती ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आश्चर्य म्हणजे, अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईल शोधून काढला आणि तो अब्दुल रेहमान यांच्या हाती सुपूर्द केला.

 

Advertisement

Advertisement