Advertisement

धारुर तालुक्यात महिलेचा खून ?

प्रजापत्र | Sunday, 10/10/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.10 अॉक्टोंबर - तालुक्यातील शिंगणवाडी येथे एका वृध्द महिलेचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सिरसाळा पोलिस ठाण्यात याबाबत नातेवाईकांनी तक्रार केली आहे. मात्र सदरील प्रकाराचा अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नव्हता.  

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, धारुर तालुक्यातील शिंगणवाडी माहेर असलेल्या तांदळवाडी येथील वृध्द महिला आश्रोबाई बाबुराव साखरे (75) यांचा दि.9 शनिवारी शिंगणवाडी येथे मृत्यू झाला. याची माहिती वृध्देचा मुलगा बालासाहेब बाबूराव साखरे यांना मिळाली. यामुळे त्यांनी आईच्या अंत्यसंस्कारासाठी रात्री प्रेत तांदळवाडी येथे आणले.  मात्र आज रविवारी सकाळी अंत्यसंस्काराची पुर्वतयारी करताना मयत महिलेच्या शरीरावर मारहाणीचे वृण आढळून आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांत याबाबत माहिती दिली. 

सदरील प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रेत धारुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर मयतेचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. दरम्यान मयत वृध्द महिलेच्या अंगावर असलेल्या मारहाणीच्या वृणामुळे संशय बळावला आहे.

मात्र मयतेच्या मुलगा व नातवांनी सिरसाळा पोलिसांत याबाबत तक्रार देवूनही गुन्हा नोंद झाला नसल्याचे कळते. याबाबत सिरसाळा पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नातलग मात्र मयत वृध्द महिलेचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. परंतू या प्रकरणातील सत्य शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे.

Advertisement

Advertisement