उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
चालकामार्फत घेतली 65 हजारांची लाच
माजलगाव - दोन महिन्यापुर्वी वाळूच्याच प्रकरणात तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना लाचेच्या प्रकरणात अटक करण्यात आले होते. हे प्रकरण ताजे असताना आता चक्क उपजिल्हाधिकारीच एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. वाळूच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी चालकामार्फत तब्बल 65 हजार रूपयांची लाच घेतल्याच्या आरोपात माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने ताब्यात घेतले आहे.
बीड जिल्ह्यात महसूल विभागाच्या आशिर्वादाने वाळू तस्करी सर्रास सुरु आहे. त्यातच गुरुवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या निवासस्थानी सापळा रचून तब्बल 65 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी श्रीकांत गायकवाड यांच्या चालकासह स्वत: गायकवाड यांनाही ताब्यात घेतले आहे. माजलगाव तालुक्यात वाळू तस्करी सर्रास सुरु असल्याच्या तक्रारी यापुर्वीही होत्या तर वाळूच्या गाड्या सुरु ठेवण्यासाठी पैसे दिल्यानंतरही पुन्हा गाड्या पकडल्या जातात आणि अधिकचे पैसे मागितले जातात. अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यामुळे थेट जालन्याच्या पथकाने माजलगावमध्ये येवून ही कारवाई केली. दरम्यान रात्री उशिरा श्रीकांत गायकवाड आणि त्यांच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची उशिरापर्यंत कसून चौकशी सुरु होती.