बीड दि. २० (प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात होत असलेल्या जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबबतच खुद्द अजित पवारांची देखील प्रतिष्ठा पणाला लागल्याची परिस्थिती आहे. मागच्या काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्याप्रमाणावर बेदिली झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पक्षाचे नेते पक्षातीलच नेत्यांवर आरोप परर्त्यारोप करताना दिसत होते, या पार्श्वभूमीवर सहाही नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीची शक्ती दाखविताना स्वतः अजित पवारांनाही प्रतिष्ठा लावावी लागणार आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आल्यानंतर जिल्ह्यात त्यांचा पक्ष एका दोरीत येईल असे अपेक्षित होते. मात्र अजित पवार स्वतः पालकमंत्री असतानाही त्यांना पक्षातील बेदिली रोखणे शक्य झालेले नाही, उलट जिल्ह्यात पक्षाच्या नेत्यांमधील गट तट अधिकच वाढल्याचे मागच्या काही दिवसात पाहायला मिळाले. आ. सोळंके यांनी आ. धनंजय मुंडेंवर केलेली जाहीर टीका असेल किंवा पंडित आणि मुंडेंमधील वाढलेले अंतर असेल, ऐन निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये डॉ. योगेश क्षीरसागर यांना राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देण्याची आलेली वेळ असेल, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सारे काही आलबेल नाही असेच चित्र जिल्ह्यात आहे.अशा वातावरणात जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये पक्षाची सत्ता आणण्यासाठी पक्षाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. बीड, माजलगाव , धारूर, गेवराई, अंबाजोगाई या पाचही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर थेट भाजपचे आव्हान आहे. त्यामुळे या ठिकाणी 'आम्ही सत्तेचा फायदा देऊ' किंवा 'आम्ही निधी रोखू ' असले काही राष्ट्रवादीला सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत पक्षाची सत्ता आणण्यासाठी स्वतः अजित पवारांना देखील आपली सारी राजकीय प्रतिष्ठा येथे लावावी लागणार आहे.
परळीत फारसे आव्हान नाही
परळीमध्ये राष्ट्रवादीची भाजपसोबत युती आहे. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या युतीला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तसे असले तरी तेथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्याप्रमाणावर मर्यादा आहेत. त्यामुळे येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, मपर्यायाने आ. धनंजय मुंडेंना फारसे आव्हान निर्माण होईल असे चित्र नाही.

