Advertisement

शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेसह भगवान फुलारी निलंबित

प्रजापत्र | Wednesday, 19/11/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१९( प्रतिनिधी): जिल्ह्यातील शिक्षण विभागात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याला अखेर मोठी कलाटणी मिळाली आहे. शिक्षकांच्या संच मान्यता मागील तारखांनी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांमुळे दोन्ही प्राथमिक आणि माध्यमिक चे शिक्षणाधिकारी यांना आज निलंबित करण्यात आले. या कृतीनंतर संपूर्ण शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

   बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्यावर शिक्षकांना संच मान्यता देताना अनियमितता केल्याचा आणि त्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप होता. या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्सही व्हायरल झाल्या होत्या. या क्लिपमध्ये “आम्ही एसआयटी मॅनेज केली” अशा प्रकारचे दावे हे अधिकारी करत असल्याचा आरोप असून, त्यामुळे या प्रकरणाची विश्वसनीयता अधिकच वाढली होती.

 

तक्रारी आणि प्राथमिक तपासानंतर शिक्षण खात्याने दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बीडच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली असून शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

 

पुढील तपास सुरू असून संबंधित ऑडिओ क्लिप्सचीही स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

Advertisement