Advertisement

मनोज जरागेंची प्रकृती बिघडली

प्रजापत्र | Wednesday, 30/10/2024
बातमी शेअर करा

जालना : विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटी यांनी राज्यभरातून अंतरवालीत उमेदवारीसाठी आलेल्या इच्छुकांपैकी काही जणांना अर्ज दाखल करायला सांगितले. अंतिम उमेदवार अर्ज कोणाचा ठेवायचा, कोणी माघार घ्यायची? या संदर्भात उद्या (ता.31) रोजी अंतरवाली सराटी येथे महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

 

 

मुंबईसह राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरू, दलित नेते या बैठकीसाठी अंतरवालीत येणार आहेत. तत्पुर्वीच आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली. (Manoj Jarange Patil) अंगात ताप आणि थकवा जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयाचे एक पथक अंतरवालीत दाखल झाले. मनोज जरांगे पाील यांच्या नियमित तपासण्या केल्यानंतर सातत्याने दौरे, बैठका, भेटीगाठींमुळे जरांगे पाटील यांना अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागल्याने त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.औषधोपचार आणि विश्रांतीचा सल्ला देऊन डाॅक्टरांचे पथक परतले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे समर्थक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या, अंतरवालीत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज बिघडली.

 

 

परंतु उद्याची बैठक पुर्वी ठरल्याप्रमाणेच होणार असून मुस्लिम धर्मगुरू, दलित समाजाचे नेते बैठकीला येणार असल्याने इतर कोणीही उद्या अंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे. (Maratha Reservation) विधानसभा निवडणुकीत कुठे उमेदवार द्यायचे, कुठे पाठिंबा द्यायचा, कोणत्या मतदारसंघात उमेदवार द्यायचे नाही,या संदर्भातील भूमिका जरांगे पाटील यांनी याआधीच स्पष्ट केली आहे.

शिवाय विधानसभा निवडणुकीत जिंकायचे असेल, ताकद दाखवायची असेल तर मराठा-मुस्लिम-दलित समीकरण जुळवावे लागेल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी आणि जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत सत्ताधारी, विरोधक अशा सगळ्याच पक्षाच्या उमेदवार, इच्छुकांची गर्दी झाली होती. जरांगे पाटील यांनी कोणालाच कुठलाही शब्द अद्याप दिलेला नाही.

Advertisement

Advertisement