राज्यात सध्या पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय झाल्याने गणेशोत्सवात मराठवाड्यातही जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान विभागाने आज संपूर्ण मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांचा पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलं असून वाऱ्यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास राहणार आहे. राज्यात ठिकठिकाणी सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात जोरदार सुरू आहेत. मागील आठवड्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्यानंतर मराठवाड्यात पुढील पाच दिवसही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संपूर्ण मराठवाड्याला येलो अलर्ट
आज हवामान विभागाने संपूर्ण मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट दिला असून छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. दिवसभर हवामान ढगाळ असून संध्याकाळी वादळी वाऱ्यांची ही शक्यता आहे.
९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.