बीड - बीड जिल्हा अंतर्गत एसटी बस पूर्वपदावर आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यात 90 बसेस रस्त्यावर धावत आहेत. गेले दाेन दिवस बस बंद राहिल्याने बीड जिल्हा राज्य परिवहन महामंडळाचे 1 कोटी 30 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलकांनी एसटी बस टार्गेट केली. त्यामुळं बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सर्वसामान्यांची लालपरी बंद होती.
दरम्यान सर्वसामान्यांची लालपरी जिल्हा अंतर्गत स्वरूपात सुरू झाली आहे. रात्री उशिरापासून ही लालपरी सुरू झाली आहे. आज जिल्ह्यातील रस्त्यांवर तब्बल 90 लालपरी धावत आहेत. दरम्यान गेली 2 दिवस एसटी बस बंद राहिल्याने, बीड विभागाचे तब्बल 1 कोटी 30 लाखाचं नुकसान झाले आहे अशी माहिती अजय मोरे (विभाग नियंत्रक, बीड) यांनी दिली.
आतापर्यंत बीड विभागाच्या 5 बसेस जाळल्या आहेत. त्यापैकी 3 शहागड परिसरात आणि 2 बीड जिल्ह्यात जाळण्यात आल्या आहेत.