Advertisement

घाटात लुटणारा अट्टल दरोडेखोर जेरबंद

प्रजापत्र | Saturday, 02/09/2023
बातमी शेअर करा

बीड दि.२(प्रतिनिधी)-धारुर हद्दीतील आसोला ते पिंपरवाडा घाटात स्कॉर्पिओ कार आडवी लावून २२ ऑगस्ट रोजी दुचाकीवरील दोघांना अज्ञात चोरटयांनी लुटल्याची घटना घडली होती.याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील आरोपींना जेरबंद केले आहे.विशेष म्हणजे यातील एका आरोपीवर तब्बल ७७ गुन्हे दाखल असून अट्टल दरोडेखोरासह त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी पकडले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचे कौतूक करण्यात येत आहे. 
           २२ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास चांभार तळ तांडयाचे पुढे आसोला ते पिंपरवाडा रोडवर घाटात श्रीकिसन कारभारी तिडके (रा.पिंपरवाडा ता.धारुर) व त्यांची भावजाई दुचाकीवरून प्रवास करत असताना घाटात त्यांच्या गाडीला स्कॉर्पिओ आडवी लावून चाकूचा धाक दाखवित सोन्याचे दागिने व 
रोख रक्कम असा १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.याप्रकरणात धारुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात 269/2023 कलम 392,341,34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींबाबतची माहिती खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी मिळाल्यानंतर भिमा लक्ष्मण मस्के (रा.बलभिमनगर) नाना सुदाम सुतार (वय-३८ वर्षे रा.पुरगस्त कॉलनी बीड),बबलु उर्फ अंबादास रामदास वीटकर (वय-२४ वर्षे रा.बलभिमनगर) या तिघांना खंडेश्वरी मंदिराजावळ स्कॉर्स्पीओ गाडीमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून  भिमा लक्ष्मण मस्के याच्यावर यापूर्वी ७७ गुन्हे दाखल आहेत.त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर,सलीम शेख,मनोज वाघ,प्रसाद कदम, देविदास जमदाडे,विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड,सचिन आंधळे अश्विनकुमार सुरवसे,अशोक कदम यांनी केलेली आहे. 

 

Advertisement

Advertisement