बीड (प्रतिनिधी) दि.1 : जालना जिल्ह्यात अंतरवाली येथे मराठा आक्रोश आंदोलन सुरु होते. या आंदोलनामध्ये मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी (दि.1) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेधच आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील भुमिकेला आणि बीडमध्ये आज (दि.2) होणार्या बीड बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठींबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात अंतरवाली येथे 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होते. महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आंदोलन सुरु असतानाच अचानक पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडत, अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चा आणि विविध संघटनांनी जिल्हा बंदची हाक दिली आहे. शांततापूर्ण होणार्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठींबा असून प्रशासनाने देखील समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.