Advertisement

चक्क मंत्रालयाच्या सुरक्षाजाळीवर उड्या मारत केले आंदोलन

प्रजापत्र | Tuesday, 29/08/2023
बातमी शेअर करा

मुंबई - अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालयात सुरक्षाजाळीवर उड्या मारत आंदोलन केले. 105 दिवसांपासून आम्ही आंदोलनाला बसलो आहेत, आमची कोणीही दखल घेतली नाही. सरकार आपल्या दारी म्हणता आज आम्ही सरकारच्या दारी आलो आहोत असे या आंदोलकांचे म्हणणे आहे.

 

 

धरण प्रकल्पात आमच्या जमिनी गेल्या. आम्हाला मोबदला देऊ, सरकारी नोकरी देऊ अशी आश्वासने देण्यात आली. मात्र आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झाले नाही, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास या प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयातील सुरक्षाजाळीवर उड्या मारल्या. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर या आंदोलकांना जाळीवरून बाजूला हटवले. यावेळी मंत्री दादा भुसे तिथे पोहोचत आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.

 

 

अप्पर वर्धा प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत. त्या शेतकऱ्यांनी मंत्रालयामध्ये आक्रमक पवित्रा घेतला. गेले अनेक दिवस हे शेतकरी त्याचे निवदेन घेऊन मंत्रालयात येत होते, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही, असं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर उद्यापर्यंत जर काही चर्चा केली नाही, तर आम्ही आत्महत्या करु असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे. सुदैवाने पोलिसांना या सर्व शेतकऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

 

 

नेमके काय घडले?
मंत्रालयामध्ये मंगळवार (29 ऑगस्ट) सकाळपासूनच एक मेडिकल कॅम्प सुरू होता. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. पण अचानक काही शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर धाव घेतली. त्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ माजली. त्यानंतर या आंदोलकांनी त्यांची सर्व परिपत्रकं खाली फेकण्यास सुरुवात केली.दरम्यान आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळी मंत्रालयात उपस्थित असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे त्याचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

 

Advertisement

Advertisement