मागच्या २ वर्षात राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी , बारावीच्या परीक्षेतील निकालाचा टक्का मोठ्याप्रमाणावर वाढत होता. यावर्षी मात्र बारावीचा निकाल मागच्या २ वर्षांच्या तुलनेत घटला आहे. मागील वर्षापेक्षा तब्बल ३ टक्क्यांनी तर त्या मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ८ टक्क्यांनी हा निकाल घसरला आहे. मागच्या काही काळात कधी ऑनलाइनच्या नावाखाली तर कधी सवलतींच्या नावाखाली गुणवत्तेचा जो फुगा फुगला होता, त्याला परंपरागत परीक्षेची टाचणी लागली असून त्यातून गुणवत्तेचे वास्तव समोर आले आहे असे समजायला हरकत नाही. बारावीच्या परीक्षेत स्पर्धा असतेच असते , मात्र या स्पर्धेच्या मागे धावताना वास्तवाचे भान असायला हवे हे सांगणारा हा निकाल आहे. यातून इतर मंडळांच्या स्पर्धेत उतरायचे असेल तर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना आणखी खूप मोठे अवकाश गाठायचे आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यंदाही या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळाले, त्या सर्वांचे अभिनंदन. यावर्षीचा राज्याचा निकाल ९१. २५ % इतका आहे. खरेतर निकालाचा टक्का हा सातत्याने वाढायला हवा , मात्र मागील २ वर्षांच्या तुलनेत यावर्षी निकाल घसरला असल्याचे चित्र आहे. गतवर्षी बारावीचा निकाल ९४. २२ % तर त्याच्या मागच्या वर्षी (२०२१ ) चक्क ९९. २३ % इतका लागला होता. त्यामुळेअचानकच राज्य मंडळाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र २०२१ आणि २०२२ या दोन्ही वर्षांमध्ये कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक सत्र आणि परीक्षा पद्धती यामुळे खऱ्या अर्थाने परीक्षा झाली का हाच प्रश्न पडावा असे चित्र होते. कधी वाढवून दिलेला वेळ, ऑनलाईन ऑलाईनचा गोंधळ , कमी गुणांची परीक्षा घेऊन त्यावर आधारित निकाल यामुळे निकालाचा टक्का अचानकच वाढला आणि गुणवत्तेचा फुगा देखील फुगला होता. यावर्षी मात्र परीक्षेत अशा कोणत्या सवलती नव्हत्या , त्यामुळे निकालाचे वास्तव समोर आले आहे. यावर्षीचा निकाल हा मधली दोन वर्षे वगळून २०२० सोबत तुलना करू गेल्यास (९०. ६६% ) काहीसा वाढला आहे. मात्र तीन वर्षानंतर ही वाढ एका टक्क्याची देखील नसेल तर मात्र या प्रगतीबद्दल खरेच विचार करण्याची आवश्यकता आहे.
मुळातच आजच्या तारखेत राज्य मंडळाच्या शाळा महाविद्यालयांना सीबीएसई आणि आयसीएसई या मंडळांचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. देशपातळीवर आज राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई आणि आयसीएसई यांच्याशी स्पर्धा करावी लागते , अशावेळी राज्य मंडळाच्या महाविद्यालयांमधून होत असलेली प्रगती कोठेतरी अंतर्मुख करायला लावणारी आहे. जिथे सीबीएसई सारख्या मंडळांचे निकाल ९६ % च्या पुढे जात आहेत, तेथे राज्य मंडळ मात्र आजही ९१ -९२ च्या घरात आहे. अर्थात टक्क्यांची ही स्पर्धा देखील पुन्हा मूठभरांचीच आहे. बारावीचा जो निकाल लागला त्यात विज्ञान शाखेचा निकाल ९६. ९ % आहे. त्यातही काही टक्के विदार्थ्यांचेच गन ९० च्या पुढे आहेत आणि सारी स्पर्धा आणि चर्चा त्यांचीच आहे.विज्ञान शाखेतील नववदी पार करू न शकलेले किंवा नावाडदि पर्यंत देखील पोहचू न शकलेल्या मोठ्या वर्गाचे काय ? किंवा कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे काय हे प्रश्न महत्वाचे आहेत . एकीकडे इतर मंडळांमधून वाढत जाणारी स्पर्धा आणि त्या तुलनेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांचे अवघडलेपण याचा सामना करताना कोठेतरी विद्यार्थी आणि पालक दोघांसमोरहूई अनेक प्रश्न आहेत . राज्य मंडळाच्या अनेक महाविद्यालयांचा निकालाचा टक्का चांगला असला म्हणजे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण चांगले असले, तरी त्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मिळालेल्या टक्केवारीचे प्रमाण बऱ्यापैकी व्यस्त आहे, त्यामुळेच सर्वच विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या प्रवाहात आणण्यात कोठेतरी महाविद्यालाये कमी पडत आहेत. ग्रामीण भागात कांतिष्ठ महाविद्यालये मंजूर करताना पायाभूत सुविधा, शिक्षक वर्ग आहे का नाही याची पुरेशी खातरजमा होत नाही, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्याल्यातील शिक्षक वर्ग शिक्षणाच्या कामासाठी किती वेळ देतो आणि इतर कामांमध्ये त्यांचा किती वेळ जातो याचे देखील मूल्यमापन होणे आवश्यक आहे. खाजगी महाविद्यालयांमधून निकालाची वाढलेली तफावत पुन्हा समाजामध्ये दरी निर्माण करणारी आहे. या निकितालामध्ये १ लाख ३१ हजार ५६१ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत , तर १ लाख ७६ हजार ७६३ विद्यार्थ्यांना ३५ टक्के ते ४५ टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. म्हणजे १४ लेखातील केवळ १ लाख ३१ हजार इतकेच विद्यार्थी विशेष प्राविण्य या सदरात मोडणारे आहेत. मग इतरांच्या केवळ 'उत्तीर्ण ' याला आजच्या स्पर्धेत आपण कसे बसविणार आहोत ? हि तफावत दूर करण्यासाठी राज्य म्हणून,आपण काय विचार करणार आहोत यावर देखील चर्चा व्हायला हवी.